बियास नदीच्या काठावरील १२ गावे पाण्याखाली; पोंग धरणाच्या पाण्याची पातळी १३९७ फुटांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:23 PM2023-08-16T23:23:17+5:302023-08-16T23:39:48+5:30
धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती.
नवी दिल्ली: पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील जवळपास १२ गावे बियास नदीच्या दोन्ही बाजूंनी पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) भारतीय लष्कर आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. बीबीएमबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये १२ आणि १३ तारखेला जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढली.
धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती. सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी १३९९ फुटांच्या आसपास पोहोचली होती. धरणात सतत पाण्याची आवक सुरू असल्याने पूर दरवाजातून एक लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
अतिरिक्त पाणी सोडण्यापूर्वी, संबंधित राज्य सरकारे, विभाग आणि सखल भागातील बाधित क्षेत्रांना सल्ला देण्यात आला होता. मात्र यामुळे अनेक गावे पाण्यात बुडाली. पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, भारतीय लष्कर आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली. नदीच्या दोन्ही काठावरील शेकडो एकर भात, मका, बाजरी, ऊस पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
नदीच्या काठावर वसलेल्या बेला लुध्याडचन, हलेध, परळ, रियाली, मंड बाधपूर या गावांमधील अनेक कुटुंबांना हेलिकॉप्टरने हलवण्यात आले आहे. पाँग धरणातील पाण्याची पातळी १३९७ फूट नोंदवण्यात आली. ते धोक्याच्या चिन्ह १३९५ च्या फक्त दोन फूट वर आहे. तलावात पाण्याची आवक ५५३६७ क्युसेक आहे, तर शाह कालवा बंधार्यात फ्लड गेट व टर्बाइनद्वारे एकूण १३८२२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.