कित्येक वर्षांपासून घरात कोंडलेल्या आई-मुलीची सुटका
By admin | Published: March 23, 2017 11:11 AM2017-03-23T11:11:35+5:302017-03-23T11:11:35+5:30
गेल्या चार वर्षांपासून स्वत:ला घरात कोंडून घेणा-या आई आणि मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - गेल्या चार वर्षांपासून स्वत:ला घरात कोंडून घेणा-या आई आणि मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. दक्षिणपश्चिम दिल्लीमधील महावीर एन्क्लेव्ह परिसरातील ही घटना आहे. महिला आणि तिची मुलगी तणावात असल्याने त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं असं सांगण्यात येत आहे.
शेजा-यांनी पोलिसांना फोन करुन 42 वर्षीय कलावती आणि त्यांची 20 वर्षीय मुलगी दिपा यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतली असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केलं. महिलेसोबत त्या घरात राहणा-या तिच्या सास-यांकडे पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. 'महिलेच्या रुमचा दरवाजा खुलाच होता', असं पोलिसांनी सांगितलं असून त्या कुपोषित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या परिस्थितीत दोघी राहत होत्या.
सुटका केल्यानंतर महिलेने पोलिसांसोबत रुग्णालयात जाण्यास नकार दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 'दोघींना मानसिक आजार असून आभासी दुनियेत जगत असतात. कलावतीचे सासरे महावीर मिश्रा जे बाजूच्याच रुममध्ये राहतात ते दिवसातून एकदाच जेवण देत असत. तेदेखील मागितल्यानंतरच दिलं जाई'.
'आपल्या पत्नीचं 2000 साली निधन झालं असून एका रस्ते अपघातात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. तेव्हापासून कलावती आणि दिपा यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं असल्याचं', महावीर मिश्रा सांगतात.
मिश्रा एमटीएनएलमध्ये लाईन्समन म्हणून काम करत होते. त्यांच्या पेन्शनवरच कुटुंब अवलंबून आहे असं ते सांगतात. 'दोघी अनेकदा मुलांशी बातचीत केल्याचा दावा करत असतात. कित्येक दिवस काहीच न खाता त्या राहतात. त्यांना रुग्णालयात दाखल करणं माझ्या आवाक्याबाहेर असल्याने एक स्थानिक डॉक्टर त्यांची तपासणी करतो', असंही त्यांनी सांगितलं आहे.