मोदी सरकारवर शरद यादवांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:06 AM2017-07-31T02:06:18+5:302017-07-31T02:06:38+5:30
नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद (यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद (यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते मात्र रविवारी एका व्टीट व्दारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे.
शरद यादव म्हणाले, ‘पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेल्या भारतीयांपैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळेधन परत आणणार ही मोदींची मुख्य घोषणा होती. त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत झाल्याचे चित्र आहे.
विविध सेवांच्या नावाखाली सरकार जनतेकडून विविध प्रकारचे सेस वसूल करीत आहे. या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झालेला नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे. केवळ खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
बिहारमधील महाआघाडीतून जद(यु)ने तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून शरद यादव नितीशकुमारांवर नाराज असल्याची उघड चर्चा राजधानीत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीशकुमारांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर रविवारपर्यंत यादव गप्प होते. विशेषत: नितीशकुमारांच्या विरोधात एक शब्दही त ेबोललेले नाहीत. शरद यादवांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून लालूप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे त्यांना आवाहन केले.
टिष्ट्वटरवर लालूप्रसाद म्हणाले : देशात गरीब, वंचित व शेतकरी वर्गावर संकट कोसळले आहे. या आपत्तीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जोरदार आंदोलन उभे करावे लागेल. देशाला पुन्हा एका नव्या संघर्षाची आता गरज आहे, शरदभाई त्यासाठी तुम्ही या. पूर्वीही आपण बरोबर संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. पुन्हा एकदा सारे मिळून या दक्षिणपंथी हुकुमशाहीला नेस्तनाबूत करू.