तेलगू देसमच्या आमदार व माजी आमदाराची हत्या, माओवाद्यांनी कारखाली उतरवून गोळ्या झाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:52 AM2018-09-24T05:52:58+5:302018-09-24T05:53:35+5:30
दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे.
हैदराबाद - दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे. हे दोघेही आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर ग्राम दर्शनी या सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. सुमारे ५० सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ल्यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. दरम्यान आंध्र-ओडिशा सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अराकू (राखीव) मतदारसंघाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि सोमू हे लिप्पिटीपुत्या या गावी पोहोचले असताना माओवाद्यांनी हल्ला केला. सर्वेश्वर राव २०१४ मध्ये वायएसआर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते, मात्र नंतर तेलगू देसममध्ये प्रवेश केला होता. माओवाद्यांचा एक गट गावकऱ्यांसोबत आला आणि जमावाने राव यांची कार रोखली. राव यांचे खासगी सुरक्षा अधिकारी आणि माजी आमदार सोमू कारबाहेर आले असता त्यांनी एके-४७ रायफलीतून गोळ्या झाडल्या. राव आणि सोमू यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी सुरक्षा अधिकाºयांना नि:शस्त्र केले होते. माओवादी आंध्र-ओडिशा सीमा समितीचे सचिव रामकृष्ण यांच्या नेतृत्वात सुमारे ५० ते ६० दहशतवादी हल्ल्यात सहभागी असावेत, असा अंदाज विशाखापट्टणमचे पोलीस उपमहानिरीक्षक सी.श्रीकांत यांनी वर्तवला आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू न्यूयॉर्कमध्ये असून, त्यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती मागितली आहे. उपमुख्यमंत्री (गृह) एन. चिना राजप्पा आणि पोलीस महानिरीक्षक (प्रभारी) हरीशकुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली.
बॉक्साईट खाणींना होता विरोध....
माओवाद्यांनी ‘नक्षल हुतात्मा सप्ताह’ आयोजित केल्यामुळे सतर्कता बाळगली असताना ही घटना घडली. आदिवासी पट्ट्यात बॉक्साईट खाणींचे काम पुन्हा सुरू करण्याला नक्षलवाद्यांचा विरोध होता. ग्रेनाईटच्या उत्खननावरून निर्माण झालेल्या वादात आमदार राव यांचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.
जमावाने दोन पोलीसठाणी जाळली...
दरम्यान, आमदार राव यांच्या हत्येच्या निषेधार्थ संतप्त जमावाने अराकू आणि डुमरिगुडा पोलीस ठाण्यांना आग लावली.पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच माओवाद्यांनी हिंसाचार केल्याचा आरोपही राव यांच्या असंख्य समर्थकांनी केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी अराकू पोलीसठाण्यात घुसून आग लावल्याने दस्तऐवज जळून खाक झाले. तेथील फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जमावाच्या उग्र रूपामुळे पोलिसांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. डुमरिगुडा पोलीसठाण्याचे जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे.