मराठा लाइट इन्फन्ट्री @ २५० ; अतुलनीय शौर्यगाथा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, वर्षभर होणार अनेक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:56 AM2018-02-04T05:56:35+5:302018-02-04T05:56:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणा-या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाºया ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास शनिवारी २५० वर्षे पूर्ण झाली. या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत.
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणा-या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाºया ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास शनिवारी २५० वर्षे पूर्ण झाली. या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत.
या रेजिमेंटचे प्रमुख (कर्नल) लेफ्ट. जनरल पी. जे. एस. पन्नू यांनी सांगितले की, दिल्लीत रविवारी होणाºया कार्यक्रमाने रेजिमेंटच्या २५१ व्या वर्षातील पदार्पणाची सुरुवात होईल. या कार्यक्रमात मराठा लाइट इन्फन्ट्रीची अभिमानास्पद शौर्यगाथा विषद करणाºया ‘व्हिक्टरी अँड व्हेलॉर’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन होईल.
युद्धभूमीवर अत्यंत चपळ हालचाली ही ओळख असलेले हे सैन्यदल ब्रिटिश काळापासून ‘लाइट इन्फन्ट्री’ चा दर्जा मिळालेली पहिली रेजिमेंट आहे, असे सांगून जनरल पन्नू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. ‘कर्तव्य, सन्मान, धैर्य’ हे आमचे ध्येय आहे आणि ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही युद्धघोषणा आहे. गनिमी युद्धातील मराठा योद्ध्यांचे कौशल्य हे स्फूर्तिस्थान आहे. जनरल पन्नू म्हणाले की, आमची रेजिमेंट नौदलाच्या ‘आयएनएस मुंबई’ युद्धनौकेशी व हवाईदलाच्या २० व्या स्क्वाड्रनशी (सुखोई) संलग्न आहे. सध्याच्या नौदल प्रमुखांनी व नौदल उपप्रमुखांनी पूर्वी ‘आयएनएस मुंबई’चे अधिपत्य केलेले असल्याने तेही सोहळ््यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. कर्नाटकमधील बेळगाव येथे या रेजिमेंटचे मुख्यालय आहे.
चार अशोकचक्रांसह ३२० शौर्य पदके
स्थापना सन १७६८. मुंबई बेटांवरील ईस्ट इंडिया कंपनीच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी ‘बॉम्ब शिपाई’ दलाची दुसरी फलटण म्हणून.
दोन व्हिक्टोरिया क्रॉस (नाईक यशवंत घाडगे व शिपाई नामदेव जाधव-दुसरे महायुद्ध) व चार अशोकचक्रांसह (कॅ. एरिक टकर, कर्नल एन. जे. नायर, कर्नल वसंत वेणुगोपाळ आणि लेफ्ट. नवदीप सिंग) एकूण ३२० शौर्य पदके
व युद्ध पदके.
पहिल्या महायुद्धात मोसापोटेमिया आघाडीवरील विजयात सिंहाचा वाटा. दुसºया महायुद्धात दक्षिण आशियाई आघाडी, उत्तर आफ्रिका व इटलीमधील युद्धआघाड्यांवर अजोड पराक्रम.
गोवामुक्ती व हैदराबाद मुक्तीसह स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक युद्धात शौर्याची पराकाष्ठा. या रेजिमेंटचे अधिकारी जनरल जे. जे. सिंग सन २००५ मध्ये देशाचे लष्करप्रमुख झाले.