मराठा आरक्षण; एकनाथ शिंदेंची केंद्राशी चर्चा, कायदामंत्र्याचीही घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:01 AM2022-09-23T11:01:21+5:302022-09-23T11:02:46+5:30
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आर्थिक आधारावर देण्यात आले आहे. या निकषाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले
नवी दिल्ली : मराठा आरक्षण कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरण रिजीजू यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रश्नांवर काही मंत्र्यांशी चर्चा केली.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आर्थिक आधारावर देण्यात आले आहे. या निकषाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्या प्रकरणी घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री रिजीजू यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षण कायम राखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन रिजीजू यांनी दिले. शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. मराठा उमेदवारांच्या नियुक्ती अध्यादेशाबद्दल संभाजीराजेंनी त्यांचे आभार मानले.
पुरी, वैष्णव यांचीही भेट
मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारची अधिक मदत मिळावी, यासाठी शिंदे यांनी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांच्याशी चर्चा केली. मुंबई रेल्वेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणाच्या व इतर प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.