Maratha Reservation : अभ्यासासाठी थोडा वेळ द्या, राष्ट्रपतींचं संभाजीराजेंससह खासदारांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:41 PM2021-09-02T20:41:12+5:302021-09-02T21:24:55+5:30
Maratha Reservation : संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आपली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे.
नवी दिल्ली - मराठाआरक्षणावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठाआरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी, राज्यातील चारही पक्षाचे प्रमुख खासदार त्यांच्यासमेवत होते. राष्ट्रपतींनीही त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घेतली.
संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आपली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. राजर्षी शाहू हे आरक्षणाचे जनक असे उद्गार राष्ट्रपतींनीही काढले. दुर्गम आणि दूरवर भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण असा जो कायद्यात शब्द आहे. तो बदलण्याची विनंती या भेटी दरम्यान केली. "मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे. मला या विषयी अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या", असं राष्ट्रपती म्हणाल्याचे संभाजीराजेंनी सांगितलं.
मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींसह भेट घेतली. याविषयी पत्रकार बांधवांशी सविस्तर संवाद.... 👇🏽 👇🏽https://t.co/1yrY8cNbjy
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 2, 2021
मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी आज खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीकरिता संभाजीराजेंनी चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवसेना खासदार विनायक राऊत व आमदार संग्राम थोपटे हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे सुरूवातीपासून आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही स्तरवर त्यांना प्रयत्न सुरु केले. मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढाईनंतर आता आंदोलन देखील सुरु करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे.