चित्रपट पुरस्कारांत मराठीची वाहवा, श्रीदेवी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:52 AM2018-04-14T05:52:02+5:302018-04-14T05:52:02+5:30
अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे डोळे ज्याकडे लागलेले असतात, त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, प्रख्यात दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर ‘मॉम’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल दिवंगत श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे डोळे ज्याकडे लागलेले असतात, त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, प्रख्यात दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर ‘मॉम’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल दिवंगत श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. ख्यातनाम दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने पुरस्कारप्राप्त चित्रपट तसेच भूमिका, दिग्दर्शन आदींची निवड केली. उत्तम करमणूक करणारा चित्रपट म्हणून ‘बाहुबली २’ ठरला आहे.
यंदाच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील ‘मृत्युभोग’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा तर सुयश शिंदे यांच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेते प्रसाद ओकचा ‘कच्चा लिंबू’ यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व रवी जाधव यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या आणि प्रेक्षकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. ‘म्होरक्या’ चित्रपटाला विशेष कामगिरीसाठीचा पुरस्कार घोषित करण्यात आला असून, ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा गौरव केला जाणार आहे.
नर्गिस दत्त पुरस्कारासाठी निपुण धर्माधिकारी यांच्या ‘धप्पा’ची निवड झाली आहे. ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांनाही पुरस्कार घोषित झाला आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील.
>मृत्युभोग, मयत, म्होरक्या, कच्चा लिंबू, ठप्पा, चंदेरीनामा,
पावसाचा निबंध यांनाही पुरस्कार
मराठीसाठीचे पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट : कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट
बालचित्रपट : म्होरक्या
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) : म्होरक्या (यशराज कºहाडे)
सर्वोत्कृष्ट
संकलन : मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (लघुपट) : पावसाचा निबंध (नागराज मंजुळे)
सर्वोत्कृष्ट लघुपट
(नॉन फीचर) मयत (सुयश शिंदे)
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट : चंदेरीनामा (राजेंद्र जंगले)
नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) धप्पा (निपुण धर्माधिकारी)