राजधानी दिल्लीत फडकली मराठी पताका; पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही योग्य दिवस निवडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:46 IST2025-02-22T09:45:10+5:302025-02-22T09:46:09+5:30
आज जागतिक मातृभाषा दिवस; संतापासून ते दिग्गज लेखकांचा केला उल्लेख

राजधानी दिल्लीत फडकली मराठी पताका; पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही योग्य दिवस निवडला...
नवी दिल्ली : जगात १२ कोटी लोक मराठी बोलतात. या सर्वांसाठी साहित्य संमेलन ही एक पर्वणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला ३०० वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आज जागतिक मातृभाषा दिवसही आहे. यामुळे आयोजकांनी साहित्य संमेलनासाठी जो दिवस निवडला आहे तो सुद्ध ऐतिहासीक आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, देशाच्या आर्थिक राजधानीतून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांनाही मी नमस्कार करतो. मराठी भाषेच्या साहित्य संमेलनाचे दिल्लीत गौरवशाली आयोजन होत आहे. हे एका राज्यापुरते मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या लढाईची झलक दर्शविणारे संमेलन आहे.
गुलामगिरीच्या काळात देशाला जेव्हा अध्यात्मिक उर्जेची गरज होती तेव्हा महाराष्ट्रातील संतांनी मोलाची भूमिका बजावली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गोरा कुंभार, मुक्ताबाई, बहिणाबाई आदी संतांनी भक्ती मार्गातून समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले आहे. याच श्रृंखलेत गदिमा, सुधीर फडके यांचे गीत रामायण लोकांना किती प्रभावित करते हे आपल्यापुढे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
कुणाचा केला उल्लेख?
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्यासह लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वासुदेव बळवंत फडके या सर्वांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. केसरी आणि मराठी वर्तमानपत्रांचा यात मोलाचा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते विंदा करंदीकर यांच्यापर्यंतच्या साहित्यिकांनी मराठीच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान शेवटी म्हणाले.
‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू
मराठी साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिक आणि रसिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
मराठीजनांनी केलेले लोकनृत्यांचे सादरीकरण व ‘अभिजात मराठी’च्या जयघोषाने राजधानीतील तालकटोरा स्टेडियमचा अवघा परिसर मराठीमय झाला होता.
जुन्या संसद परिसरातील रकाबगंज गुरुद्वाराजवळ ग्रंथपूजन, ध्वजारोहण होऊन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर येथून साहित्य संमेलनासाठी आलेली विशेष दिंडीही सोबत होती. ढोलताशाच्या गजरासह दिंडीत लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, आदिवासी नृत्य, आदी लोककला, लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे फुगडी खेळली.