मराठी परिपूर्ण भाषा अन् अमृताहूनी गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 02:10 IST2025-02-22T02:08:46+5:302025-02-22T02:10:20+5:30

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

Marathi is a perfect language and sweeter than nectar, praises Prime Minister Narendra Modi | मराठी परिपूर्ण भाषा अन् अमृताहूनी गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

मराठी परिपूर्ण भाषा अन् अमृताहूनी गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : मराठी ही संपूर्ण भाषा आहे. मी जेव्हा मराठीबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके’, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेची श्रीमंती विशद केली.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विज्ञान भवनात थाटात उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष खा. शरद पवार, मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे, महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, संजय नहार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधानांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. ते म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मराठीचे मी देशाच्या राजधानीत अतिशय मनापासून अभिवादन करतो.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हे माझे भाग्य : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला हे मी माझे भाग्य समजतो, असे मोदी यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. भाषा संस्कृतीची वाहक असते. एक उत्तम समाज निर्माण करण्याचे काम भाषा करीत असते, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

काश्मिरी मुलींकडून नमोकार मंत्र, पसायदान : काश्मिरी मुलगी रुकय्या मकबूल हिने नमोकार मंत्र म्हटला. काश्मिरचीच शमिमा अख्तर हिने जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गीत सादर केले. शमिमा हिनेच कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हटले.

राजकारण व साहित्य एकमेकांना पूरक : पवार

साहित्यिक आणि राजकारणी यांचे एक अतूट नाते आहे. संमेलनाच्यावेळी नेहमी जी चर्चा होत असते ती यावेळी झाली नाही ही आनंदाची बाब असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

टिळक, नेहरू, वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या थोर माणसांनी साहित्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. राजकारणातील माणसे साहित्य क्षेत्रात आहेत. राजकारण आणि साहित्य  एकमेकांना पूरक आहेत, असेही पवार म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जी भूमिका बजावली आहे त्यासाठी मी समस्त मराठी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.

भाषा बोलू तर जिवंत राहील : डॉ. भवाळकर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, भाषा ग्रंथात किंवा पुस्तकात राहून जीवंत राहणार नाही तर ती जेव्हा बोलली जाईल तेव्हा जिवंत राहील. भवाळकर यांच्या भाषणानंतर 'छान झाले' अशा शब्दात मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. भवाळकर यांनी देखील 'मळे पण गुजरात आवडे छे' असे गुजरातीत मोदी यांना उत्तर दिले.

आता दिल्ली विचाराने जिंकावी लागेल : मुख्यमंत्री

एकेकाळी दिल्ली शस्त्राने जिंकली जात होती. मात्र, आता दिल्ली जिंकायची असेल तर विचाराने जिंकावी लागेल. १७३७ मध्ये रानोजी शिंदे यांनी ज्या तालकटोरा येथे छावणी लावून दिल्ली जिंकली होती त्याच तालकटोरा स्टेडियममध्ये साहित्य संमेलन होत आहे ही मराठी माणसाची अभिमानाची गोष्ट आहे. जो मातृभाषेवर प्रेम करतो त्याला माया आणि वात्सल्य काय आहे हे समजते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Web Title: Marathi is a perfect language and sweeter than nectar, praises Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.