मराठी टक्क्यासाठी आटापिटा
By admin | Published: February 2, 2015 05:01 AM2015-02-02T05:01:06+5:302015-02-02T08:54:54+5:30
अरविंद केजरीवाल यांनी नाकी नऊ आणल्यामुळे धास्तावलेल्या भाजपाश्रेष्ठींनी आता प्रादेशिक व भाषिक फासे टाकायला सुरुवात केली आहे
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी नाकी नऊ आणल्यामुळे धास्तावलेल्या भाजपाश्रेष्ठींनी आता प्रादेशिक व भाषिक फासे टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून मराठी टक्का आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह आजी-माजी मंत्र्यांना पक्षाने प्रचाराच्या मैदानात उतरविले आहे.
दिल्लीतील मराठी मते भाजपाला खुणावू लागली आहेत. प्रादेशिक व भाषिक रणनीतीचा भाग म्हणून रावसाहेब दानवे आणि सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मराठी टक्का भाजपाकडे आकर्षित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. राजधानीत जवळपास चार लाख ८० हजार मराठी भाषिक असून, सुमारे ४० मतदारसंघांत मराठी टक्का विखुरलेला आहे़ तो टक्का आपल्या झोळीत पडावा, यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे.
येथील मराठा मित्र मंडळाच्यावतीने रविवारी मेळावा झाला. दानवे व पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास सुमारे एक हजार मराठी नागरिक उपस्थित होते. एकमेकांना तीळगूळ भरवत दिल्लीत ‘आप’वर संक्र ांत आणण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या दिल्लीत स्थलांतरित झालेल्या सुवर्णकार व्यावसायिकांना आकर्षित करण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपवली. दिल्लीत अशा प्रकारचे १० मेळावे घेणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.