विश्व पुस्तक मेळ््यात मराठीचा एकमेव स्टॉल

By admin | Published: January 14, 2016 12:18 AM2016-01-14T00:18:40+5:302016-01-14T00:18:40+5:30

प्रगती मैदानावरील सुरू असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘विश्व पुस्तक मेळ््यात’ जगातील ३० देशांमधील विविध भाषेतील पुस्तके व लक्षवेधक प्रकाशनांचे आकर्षक स्टॉल्स

Marathi's only stall in the World Book Fair | विश्व पुस्तक मेळ््यात मराठीचा एकमेव स्टॉल

विश्व पुस्तक मेळ््यात मराठीचा एकमेव स्टॉल

Next

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
प्रगती मैदानावरील सुरू असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘विश्व पुस्तक मेळ््यात’ जगातील ३० देशांमधील विविध भाषेतील पुस्तके व लक्षवेधक प्रकाशनांचे आकर्षक स्टॉल्स सजले असताना यंदाही मराठी पुस्तके व प्रकाशनांचा केवळ एक स्टॉल असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या आग्रहाचे झेंडे फडकवले जातात. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात यासाठी तोडफोड आंदोलने होतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिखाऊ आग्रहदेखील धरला जातो. तथापि जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य, उत्तम ग्रंथ व प्रकाशने पोहोचावीत यासाठी मात्र कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
यंदाच्या विश्व पुस्तक मेळ्यात मराठी पुस्तकांचा एकमेव स्टॉल आहे तो मराठी प्रकाशक संघाचा. तो देखील दिल्लीत दोन जणांच्या नऊ दिवसांच्या फुकट निवास व्यवस्थेसह विनामूल्य भाड्याचा स्टॉल. सर्वात लहान आकाराच्या या स्टॉलमध्ये मराठीतील नामवंत प्रकाशनांचा तसा अभावच आहे. पुण्याच्या कुमार एजन्सीजचे सुकुमार बेरी दरवर्षी निवडक पुस्तकांसह निष्ठेने हा स्टॉल सजवतात आणि राजधानीत कसेबसे मराठीचे निशाण फडकवतात. याखेरीज साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या मोठमोठ्या स्टॉल्समध्ये कुठेतरी मराठी पुस्तकांचे एखादे टेबल दिसते. जागतिक दर्जाच्या पुस्तक मेळ््यात इतकेच काय ते मराठीचे अस्तित्व. दिल्लीत केंद्रीय सचिवालय, संसदेचे ग्रंथालय, दिल्ली विद्यापीठ, जेएनयु आदी ठिकाणी प्रत्येक भाषेतील निवडक ग्रंथसंपदेच्या खरेदीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचे बजेट असते.केंद्रीय सचिवालयात मराठी भाषेसाठी पूर्वी स्वतंत्र ग्रंथपालही असे.
दिल्लीत दोन लाखांहून अधिक मराठी भाषकांचे वास्तव्य आहे. त्यांना मराठी पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी कोणाचेही लक्ष नाही. नॅशनल बुक ट्रस्टमध्ये सुषमा सोनक, राहुल कोसंबींसारखे उत्साही कार्यकर्ते होते तेव्हा दिल्लीत मराठीविषयी किमानपक्षी काहीतरी घडत
होते. आता या बाबतीत सारा शुकशुकाटच आहे.

आतबट्ट्याचा व्यवहार
विश्व पुस्तक मेळ््याबाबत मराठी प्रकाशकांमध्ये अनास्था का? याचा शोध घेतला असता जी कहाणी समजली ती थोडी अर्थकारणाशी संबंधित आहे. नऊ दिवसांच्या ग्रंथयात्रेत येथे सर्वात लहान स्टॉलचे एकूण भाडे ३५ हजार रुपये आहे. याखेरीज पुस्तकांची वाहतूक, पॅकिंग व सेल्समनच्या निवास, भोजन इत्यादी व्यवस्थेचा ३० ते ४० हजारांचा खर्च होतो. मेळ््यात मराठी पुस्तकांची फारतर ३० ते ४० हजारांची विक्री होते. या आतबट्ट्याच्या व्यवहाराला मराठी प्रकाशक तयार नाहीत. राज्य शासनाने त्यात थोडा पुढाकार घेतला, मराठी भाषेच्या संवर्धनाला मदत करण्यासाठी काही ठोस पावले उचलली तर कदाचित हे चित्र बदलू शकते.

Web Title: Marathi's only stall in the World Book Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.