मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जाहीर करावे : दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 03:57 AM2018-08-10T03:57:45+5:302018-08-10T03:59:16+5:30
मराठवाड्यातच मराठा आरक्षणाबाबतचा असंतोष सर्वाधिक आहे.
नवी दिल्ली : मराठवाड्यातच मराठा आरक्षणाबाबतचा असंतोष सर्वाधिक आहे. हैदराबाद संस्थानामधून मराठवाडा स्वतंत्र झाला. त्यानंतर हैदराबादमध्ये राहणारे अन्य मागासवर्गीय कुणबी मराठवाड्यात मराठा झाले. त्यांना पुन्हा कुणबी जाहीर केले, तर ते पुन्हा अन्य मागासांमध्ये येतील व आरक्षण देण्याचा प्रश्नच संपेल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, ‘विदर्भ, कोकण व उत्तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन नाही. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन होत आहे. येथे मराठा समाज अधिक आहेत. हैदराबाद संस्थान या राज्यात मराठवाड्याचा बराचसा भाग होता. तेथे कुणबी म्हणजेच शेतकरी हे अन्य मागासवर्गीय होते. राज्यवार रचना झाल्यानंतर ते मराठवाड्यात समाविष्ट झाले. कुणब्यांना मराठा ही जात कशी लावली गेली समजत नाही, पण मराठवाड्यातील मराठ्यांचा समावेश कुणब्यांमध्ये केला तर आरक्षण मागण्याचा प्रश्नच राहणार नाही.’