१९ मार्चला अंधारात बघा भारत-पाक सामना - शिखर धवनचे आवाहन
By admin | Published: March 16, 2016 11:44 AM2016-03-16T11:44:35+5:302016-03-16T12:13:58+5:30
१९ मार्च रोजी अर्थ अवर डे साजरा होत असून घरातील अनावश्यक दिवे बंद करून भारत-पाकिस्तान सामना पहावा, असे आवाहन क्रिकेटपटू शिखर धवनने केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - येत्या शनिवारी, म्हणजेच १९ मार्च रोजी टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान दरम्यान होणा-या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. कोलकात्यातील ईडन गार्डने येथील या सामन्यात कोणाची सरशी होते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना हा सामना अंधारात बघावा लागण्याची शक्यता आहे आणि त्याचे कारण आहे 'अर्थ अवर डे'....
ग्लोबल वॉर्मिंगविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगभरात 'अर्थ अवर' साजरा केला जातो. या दिवशी कमीत कमी विजेचा वापर करण्यात यावा, हाच त्यामागील उद्देश असतो. त्यामुळे येत्या शनिवारी, म्हणजे १९ मार्च रोजी अर्थ अवर साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने रात्री ८.३० ते ९.३० या एका तासासाठी जगभरातील अनावश्यक दिवे बंद ठेवण्यात येणार आहेत
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन हा यंदा भारतात 'अर्थ अवर'विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून देशातील जास्तीत जास्त लोकांनी अर्थ अवर पाळावा यासाठी त्याने आवाहन केले आहे. ' देशभरातील क्रिकेट रसिकांनी शनिवारी एका तासासाठी घरातील अनावश्यक दिवे तसेच वीजेची इतर उपकरणे बंद करावीत आणि भारत-पाकिस्तान सामना अंधारात पहावा' असे आवाहन धवनने केले आहे. ' जगातील वातावरणात होणारा बदल ही एक समस्या असून ती सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत,' असेही शिखर धवनने नमूद केले आहे.
विशेष म्हणजे या वेळात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन सह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांतील दिवेही बंद ठेवण्यात येणार आहेत.