‘इंडिया’चा संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा; सरकारने लोकशाही पद्धतीने वागावे : खरगे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 06:12 AM2023-12-22T06:12:03+5:302023-12-22T06:12:21+5:30
‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. पंतप्रधानांनी सुरक्षा भंगावर न बोलून संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला.
‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला. विजय चौक येथे खरगे म्हणाले की, लोकशाहीत बोलणे हा विरोधकांचा अधिकार असून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना संसदेत पोहोचवणे, ही खासदारांची जबाबदारी आहे. संसद ही मोठी पंचायत आहे. कोणी संसदेत बोलायचे नसेल तर मग कोठे बोलायचे?
विरोधी पक्षाचे खासदार सभापती धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावर बोलू देण्याची विनंती वारंवार करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्य कामकाजात अडथळा आणत आहेत. यावरून भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेस प्रमुखांनी केला. खरगे यांनी सरकारला लोकशाही पद्धतीने वागण्याचे आवाहनही केले.
मूळ मुद्यावरून भरकटवणे हेच काम
जातनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर गप्प राहिल्यानंतर आता सरकार शेतकरी व जातीबद्दल बोलत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. मोडतोड करणे, मूळ मुद्यांवरून भरकटवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे, असे ते म्हणाले.