वैवाहिक बलात्कार ठरेल घटस्फोटाचे कारण- केरळ उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:15 AM2021-08-08T06:15:47+5:302021-08-08T06:16:09+5:30

घटस्फोटाविरुद्ध डॉक्टर पतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.

Marital rape will be the reason for divorce says kerala high court | वैवाहिक बलात्कार ठरेल घटस्फोटाचे कारण- केरळ उच्च न्यायालय

वैवाहिक बलात्कार ठरेल घटस्फोटाचे कारण- केरळ उच्च न्यायालय

Next

थिरुवनंतपुरम : वैवाहिक बलात्कार हे घटस्फोट घेण्यासाठी पुरेसे कारण ठरू शकते, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. वैवाहिक बलात्कारास कायद्यानुसार मान्यता नसली तरी त्यास एक क्रौर्य ठरवून घटस्फोट मंजूर करण्यापासून न्यायालयास रोखले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

घटस्फोटाविरुद्ध डॉक्टर पतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, पत्नीचे शरीर आपल्या मालकीचे आहे, असे समजून तिच्या मर्जीविरुद्ध केलेला समागम हा वैवाहिक बलात्कारच आहे.  यासंबंधीचा अनादर हा वैयक्तिक स्वायत्ततेचे उल्लंघनच आहे. 

केरळ उच्च न्यायालयाचे न्या. ए. मुहमेद मुस्ताक आणि डॉ. कौसर एदप्पागथ यांच्या खंडपीठाने ३० जुलै रोजी हा निर्णय दिला. निवाड्याची प्रत शुक्रवारी अपलोड करण्यात आली. देशात लग्न आणि घटस्फोटासाठी धर्मनिरपेक्ष कायदा करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्टपणे नमूद करतानाच न्यायालयाने म्हटले की, आपल्या वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करण्यास प्रत्येक नागरिक मुक्त आहे. 

पत्नीचे पतीवर गंभीर आरोप
या प्रकरणातील पत्नीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नीने म्हटले की, आपण आजारी असतानाही पती समागमासाठी जबरदस्ती करायचा. आपल्या आईचे निधन झाले त्या दिवशीही त्याने जबरदस्ती समागम केला.
अनैसर्गिक समागमासाठीही तो जबरदस्ती करायचा. इतकेच नव्हे, तर आपल्या मुलीसमोरही समागमासाठी जबरदस्ती करायचा. इतके सारे सहन करूनही तो आपल्यावरच अनैतिक संबंध असल्याचा संशय घ्यायचा.

Web Title: Marital rape will be the reason for divorce says kerala high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.