झुकेरबर्ग झुकला, नेटीझन्सच्या ट्रोलिंगनंतर शेतकरी आंदोलकांचे फेसबुक पेज सुरू
By महेश गलांडे | Published: December 21, 2020 10:29 AM2020-12-21T10:29:38+5:302020-12-21T10:31:05+5:30
फेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेसनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. त्यामुळे, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक आणि नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत गेल्या 25 दिवसांपासून शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाचा 26 वा दिवस आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या 3 शेती विधेयकास विरोध दर्शवत शेतकरी एकत्र आले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक सेलिब्रिटींनीही शेतकरी आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, या आदोलक शेतकऱ्यांकडून सुरू करण्यात आलेल्या किसान एकता फेसबुक पेजला फेसुबककडून बंद करण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियावरील विरोधानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
फेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेसनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. त्यामुळे, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक आणि नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत. फेसबुक आणि ट्विटररच्या माध्यमातून नेटीझन्स आपला रोष व्यक्त करत आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहून तर ट्विटरवर झुकेरबर्गच्याविरोधात ट्रेंड सुरू करुन फेसबुकचा निषेध करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर फेसबुक आणि झुकेरबर्गविरुद्ध रोष पाहायला मिळाला.
सोमवार सकाळपासूनच ट्विटरवर #zukerbergshameonyou आणि #FacebookShameonyou हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. मार्क झुकरबर्ग भाजपाच्या बाजुने काम करत असल्याचा आरोपही नेटीझन्सकडून होत आहे. तर, झुकेरबर्ग हा भाजपाचा चमचा असल्याचा आरोपही अनेकांनी केलाय. मात्र, सोशल मीडियातील विरोधानंतर फेसबुकने पुन्हा किसान एकता मोर्चा हे पेज सुरू केले आहे.
किसान एकता मोर्चा पेजवरुन आंदोलनाशी संबंधित अधिकृत माहिती देण्यात येत आहे. शेतकरी आंदोलनाची दिशी आणि रणनिती नेटीझन्स आणि जगभरातील समर्थकांपर्यंत पोहोचविण्याचं काम या पेजद्वारे सध्या सुरू आहे. त्यामुळेच, हे फेसबुक पेज बंद झाल्यानंतर नेटीझन्सने आक्रोश करत झुकरबर्गला फैलावर घेतले होते.