मार्क झुकरबर्गने स्नॅपचॅटला डिवचलं, म्हणाले फेसबुक सर्वांसाठी
By admin | Published: April 19, 2017 09:43 PM2017-04-19T21:43:04+5:302017-04-19T21:43:04+5:30
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही स्पीगल यांच्या त्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंतांसाठी आहे असं वादग्रस्त विधान स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांनी केलं होतं. त्यानंतर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि विविध स्थरांतून स्पीगल यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही स्पीगल यांच्या त्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
फेसबुक केवळ मोठ्या युजर्ससाठी नसून ते समाजातील सर्व लोकांसाठी आहे. ज्या गोष्टी युजर्सला हव्या असतील त्याबाबत आम्ही विचार करतो आणि त्या समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असं कॅलिफोर्नीयामध्ये एका कार्यक्रमात बोलताना झुकरबर्ग म्हणाले. टेकक्रंचने याबाबत वृत्त दिलं आहे.
2015 मध्ये "ग्रोथ ऑफ अॅप्स यूजर बेस इन" या विषयावरील चर्चेसाठी झालेल्या बैठकीत इवान स्पीगल यांनी भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंतांसाठी आहे हे वक्तव्य केलं होतं. या बैठकीत एका कर्मचा-याने भारतात आपल्या अॅपचा झपाट्याने प्रसार होत नाही याबाबत चिंता व्यक्त केली असता, त्या कर्मचा-याचं म्हणणं ऐकून न घेता स्पीगल म्हणाले, मी भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशात व्यापार वाढवू इच्छित नाही. आपलं अॅप हे फक्त श्रीमंतांसाठी आहे.
स्पीगल यांच्या या वक्तव्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी इव्हान यांच्या वक्तव्यावर टीका करत हे अॅप अनइन्स्टॉल करण्यास सुरुवात केली होती. तसेच ह्या अॅपला वाईट रेटिंग देण्यासही सुरुवात झाली होती.त्यामुळे गुगल स्टोअरवर स्नॅपचॅटची रेटींग झपाट्याने उतरली होती.