तमिळनाडू, केरळ सीमेवर विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:05 AM2020-05-29T00:05:12+5:302020-05-29T00:05:21+5:30
विवाह होण्यामध्ये आयत्या वेळी निर्माण झालेल्या संकटामुळे वधूवर व त्यांचे पालक अजिबात गांगरून गेले नाहीत.
कोची : केरळची वधू व तमिळनाडूचा वर यांचा विवाहसोहळा दोन्ही राज्यांच्या सीमेवरील चेक पोस्टजवळ पार पडल्याची आगळी घटना सोमवारी घडली. लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध असल्याने तमिळनाडूमध्ये राहणाºया वराला केरळमध्ये विवाहाच्या नियोजित स्थळी जाण्यासाठी ई-पास न मिळाल्यामुळे मोठी अडचण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी सरतेशेवटी वधूवरांचा सीमेवर विवाह पार पाडण्याची भन्नाट शक्कल लढविण्यात आली.
तमिळनाडूतील तेणी जिल्ह्यातील कुमबुम या शहरात राहणाºया आर. प्रशांत याचा विवाह केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात राहणाºया गायत्रीशी ठरला होता. हा विवाह सोहळा सोमवारी केरळमधील एका मंदिरात होणार होता. विवाहासाठी एकदम नटूनथटून निघालेल्या प्रशांतला कुमिली चेक पोस्टवर अडविण्यात आले. वर व त्याच्या कुटुंबीयांना केरळच्या हद्दीत प्रवेश देण्यास त्या राज्यातील पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रशांतने वधू गायत्रीला दूरध्वनीवर सर्व परिस्थिती समजावून सांगितली. तोपर्यंत गायत्री विवाहाच्या नियोजित स्थळी पोहोचली होती.
विवाह होण्यामध्ये आयत्या वेळी निर्माण झालेल्या संकटामुळे वधूवर व त्यांचे पालक अजिबात गांगरून गेले नाहीत. दोन्ही बाजूकडच्या मंडळींनी लगेचच केरळ पोलिसांशी चर्चा करून एक भन्नाट तोडगा काढला तो म्हणजे विवाह सोहळा कुमिली चेक पोस्ट जवळच पार पाडण्याचा. तो विचार खरेतर कुमिलीचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश यांनीच वºहाडी मंडळींना सुचविला होता. त्याला होकार देताच वधूसह तिच्या मोजक्या नातेवाइकांना केरळ पोलिसांनी तमिळनाडूच्या हद्दीत जाऊ दिले. तिथे वधूवरांनी वरमाला घातल्या व उपस्थित नातेवाइकांनी टाळ्या वाजवून दोघांचेही अभिनंदन केले. (वृत्तसंस्था)
च्कुमिली चेक पोस्टजवळ झालेल्या विवाहसोहळ्याला पोलीस, आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांनीही हजेरी लाऊन आशीर्वाद दिले. त्यानंतर वधू आपल्या नातेवाइकांसह केरळच्या हद्दीत परतली. लॉकडाऊनमुळे लागू केलेल्या नियमांमुळे संकट उभे राहूनही योग्य तोडगा निघाल्याने विवाह लांबणीवर टाकण्याची वेळ आली नाही, हेच समाधान वधूवर व त्यांच्या नातेवाइकांसाठी मोठे होते.