"मी सासरी जाणारच नाही..."; पाठवणीच्या वेळी नववधू अडून बसली; नातेवाईक हैराण, झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 04:00 PM2022-07-12T16:00:00+5:302022-07-12T16:07:52+5:30
थाटामाटात लग्न झालं, सप्तपदीही घेतल्या. पण जेव्हा नवरीच्या पाठवणीची वेळ आली. तेव्हा मात्र नवरीने थेट मी सासरी जाणारच नाही असं म्हटलं.
नवी दिल्ली - लग्नाचे भन्नाट किस्से हे समोर येत असतात. अशीच एक अजब घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. नवरदेव देखील वरात घेऊन आला. थाटामाटात लग्न झालं, सप्तपदीही घेतल्या. पण जेव्हा नवरीच्या पाठवणीची वेळ आली. तेव्हा मात्र नवरीने थेट मी सासरी जाणारच नाही असं म्हटलं. हे ऐकून सर्व नातेवाईक हैराण झाले. मंडपात एकच गोंधळ उडाला. नवरदेवाने तर मदतीसाठी थेट पोलिसांत धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रतनपुरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. उखडा गावातील मुकेश कुमार वरात घेऊन रतनपुरा गावात आला. जेव्हा त्यांची सप्तपदी होत होत्या तेव्हा कुणीतरी नवरदेवाला चालता येत नाही असं सांगितलं. नवरीने ते ऐकलं पण त्याकडे तिने फार लक्ष दिलं नाही. लग्न झाल्यानंतर नवरा-नवरीला घरात देवाच्या पूजेसाठी नेण्यात आलं.
नवरी तेव्हा पुढे आणि नवरा मागे चालत होता. जिना चढताना मात्र त्याचा तोल गेला. सुरुवातीला नवरदेव दारू प्यायला असेल असा संशय नववधूला वाटला. पण नंतर त्याच्या पायातच समस्या असल्याचं तिला समजलं. त्यामुळे जेव्हा पाठवणीची वेळ झाली तेव्हा नवरीने नवरदेवासोबत सासरी जाण्यास नकार दिला. तिच्या म्हणण्यानुसार लग्नाआधी ना तिने त्याला पाहिलं होतं, ना पसंत केलं होतं.
कुटुंबाची इच्छा आणि त्यांच्या मर्जीनुसार ती लग्न करत होती. पण आता तो दिव्यांग आहे हे समजलं. त्याच्या पायात काहीतरी समस्या आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत लग्न करेन पण याच्यासोबत सासरी जाणार नाही असं नववधूने सांगितलं. त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.