लग्न मंडपापर्यंत नवरदेवानं BMW कार आणली नाही म्हणून राडा; वधूला न घेताच वरात परतली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:30 PM2022-05-17T14:30:36+5:302022-05-17T14:32:57+5:30
गुजरातच्या आणंदमध्ये लग्नानंतर वधूची पाठवणीच होऊ शकली नाही. रात्री लग्नाचे सर्व रितीरिवाज मोठ्या उत्साहात पार पडले आणि सकाळी वधूच्या सासरी पाठवणीची तयारी सुरू होती.
आणंद-
गुजरातच्या आणंदमध्ये लग्नानंतर वधूची पाठवणीच होऊ शकली नाही. रात्री लग्नाचे सर्व रितीरिवाज मोठ्या उत्साहात पार पडले आणि सकाळी वधूच्या सासरी पाठवणीची तयारी सुरू होती. पण वधू आणि वर पक्षामध्ये BMW कारवरुन वाद झाला. यानंतर वधूला न घेताच वरात माघारी गेली.
गुजरातच्या आणंद येथील नापाडवांटा गावात हा प्रकार घडला आहे. लग्नात नवरदेव BMW कारमधून आला होता. पण गावातील रस्ता इतका खराब आणि लहान होता की विवाह स्थळापर्यंत कार पोहोचणं शक्य नव्हतं. यामुळे नवरदेवाला बाइकवर बसून लग्न मंडपापर्यंत पोहोचावं लागलं. दोन्ही कुटुंबांनी मोठ्या आनंदात लग्नाचे सर्व रितीरिवाज पूर्ण केले. पण वधूच्या पाठवणीच्या काही मिनिटं आधी वर पक्षानं वाद सुरू केला. दोन्ही पक्षांमधील वाद इतक विकोपाला गेला की हाणामारी झाली. त्यानंतर प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं.
वधू पक्षातील पाहुण्यांनी मद्यसेवन केलं होतं आणि जोवर BMW कार मंडपापर्यंत येत नाही तोवर आम्ही वधूला सासरी पाठवणारच नाही यावर वधूपक्षातील लोक अडून बसले, असा आरोप वर पक्षानं केला आहे. इतक्या लहान आणि खराब रस्त्यावरुन BMW येणार नाही असं वर पक्षातील लोकांनी सांगितलं. आधीच आम्ही वराला बाइकवरुन इथवर घेऊन आलो आहोत. त्यामुळे तुम्ही आधी रस्ता रुंद करा मग BMW आत येईल, असं वर पक्षातील लोकांनी म्हटलं. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला.
वाद इतका विकोपाला गेला की त्याचं हाणामारीत रुपांतर झालं आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. वधूची पाठवणीच होऊ शकली नाही. वर पक्ष वधूला न घेताच माघारी परतला. नवरदेवाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली आणि मारहाणीचा आरोप केला. रस्ता लहान आणि खराब असल्यानं बीएमडब्लू कार आत मंडपार्यंत नेली नाही म्हणून वधू पक्षातील लोकांनी राडा केल्याचं नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. तर वधू पक्षानं वर पक्ष हुंड्याची मागणी करत होते. त्यांनी रोकड आणि बाइक देखील मागितली असा आरोप केला आहे. वधूच्या आईनं देखील वर पक्षानं दोन लाख रुपये आणि बाईक मागितल्याचं म्हटलं आहे. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर चौकशी केली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.