मुस्लिम संस्था करणार हिंदू मुलीचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:37 AM2020-01-06T04:37:58+5:302020-01-06T04:38:04+5:30
देशातील सेक्युलर विचारसरणीचा धागा विरत चालला आहे,
आलापुझा : देशातील सेक्युलर विचारसरणीचा धागा विरत चालला आहे, असे वाटत असतानाच, केरळमध्ये चेरावल्ली मुस्लिम जमात या संस्थेच्या सदस्यांनी एका हिंदू मुलीचा विवाह लावून देण्याची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली आहे. १९ जानेवारी रोजी केरळच्या एका मशिदीत हिंदू पद्धतीनेच होणाऱ्या या विवाहाचा सर्व खर्च मुस्लिम बांधवच करणार आहेत.
आपल्या मुलीच्या विवाहासाठी काही आर्थिक मदत करावी असा अर्ज बिंदू या महिलेने चेरावल्ली मुस्लिम जमात या संस्थेकडे दोन महिन्यांपूर्वी केला होता. त्यावर माणुसकीच्या नात्याने या संस्थेच्या सदस्यांनी विचार करून तो अर्ज मान्य केला. बिंदूच्या मुलीला विवाहप्रसंगी भेट म्हणून १० सोन्याची नाणी व २ लाख रुपये संस्थेतर्फे देण्यात येणार आहेत. बिंदूचा पती अशोकन याचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.(वृत्तसंस्था)
>बेताची आर्थिक परिस्थिती
बिंदूचा पती वारल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते. केरळ व्यापारी एकता समितीचे निजामुद्दीन यांनी अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत केली होती. बिंदूने आपल्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून २ आॅक्टोबर रोजी माझ्याशी संपर्क साधला. मी तिचा अर्ज चेरावल्ली मुस्लिम जमात या संस्थेकडे पाठविला. तो या सदस्यांनी मंजूर केला, अशी माहिती निजामुद्दीन यांनी दिली.