माऊंट एव्हरेस्टवर विवाह
By admin | Published: May 16, 2017 01:41 AM2017-05-16T01:41:27+5:302017-05-16T01:41:27+5:30
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो. काही लोक आपला विवाह सोहळा संस्मरणीय करण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग
नवी दिल्ली : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो. काही लोक आपला विवाह सोहळा संस्मरणीय करण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग व स्पेशल व्हिडिओज यांचा आधार घेतात. मात्र, या जोडीने हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर विवाह केला. कॅलिफोर्नियाचा रहिवासी जेम्स सीसॉम (३५) आणि अॅशले स्मिडर (३२) हे दोघे सध्या खूप चर्चेत आहेत. दोघांनी माऊंट एव्हरेस्टवर विवाह करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जेम्स आणि अॅशलेने माऊंट एव्हरेस्टवर विवाह करण्यासाठी खास तयारी केली होती. विवाह सोहळ्याची छायाचित्रे टिपण्यासाठी अॅडव्हेंचर वेडिंग फोटोग्राफर चार्लेटन चर्चिल यांनाही त्यांनी सोबत नेले होते. या तिघांना १४ हजार फुटांची चढाई करावी लागली. जेम्स आणि अॅशले यांना येथे पोहोचण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला. त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि अत्यंत शानदार पद्धतीने या सोहळ्याची छायाचित्रे टिपण्यात आली. त्यांची छायाचित्रे पाहून लोक थक्क झाले. जेम्स आणि अॅशले यांना अनोख्या पद्धतीने विवाह करायचा होता. आपल्या विवाह सोहळ्यामुळे लोक थक्क व्हावेत आणि आपले लग्न संस्मरणीय ठरावे, असे त्यांना वाटत होते. या विवाहाचे नियोजन करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागले. मात्र, त्यांचे हे स्वप्न साकार झाले. ‘तेथे तापमान अत्यंत थंड होते. आम्ही स्वत:ला उष्ण ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यासाठी उबदार कपड्यांशिवाय गरम सूप, जेवण आणि पातळ पदार्थांचे अधिक सेवन करीत होतो’, असे या जोडप्याने सांगितले. शरीर गरम ठेवण्यासाठी ते जास्तीत जास्त चालत होते. माऊंट एव्हरेस्टवर विवाह, जेवण आणि पॅकिंगसाठी त्यांना दीड तास लागला.