वऱ्हाडी आले, दारू न मिळाल्यानं विधी न करताच बसून राहिले; लग्न मोडण्याची वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 07:05 AM2021-04-08T07:05:53+5:302021-04-08T07:10:17+5:30
दारुबंदीमुळे आदिवासी युवतीचे लग्न थांबले: बिहारमध्ये सरपंचाला अटक
- एस.पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये दारूबंदी कायद्यामुळे एका आदिवासी युवतीचे लग्न मोडण्याच्या पायरीवर आले आहे. घरी आलेले वऱ्हाडी लग्नाचे विधी न करताच बसून आहेत. ही घटना बांका जिल्ह्यातील बौंसी ठाण्याच्या हद्दीतील लौंगाय पंचायतमधील.
आदिवासी परंपरेनुसार देवी-देवतांना नैवेद्य म्हणून दारू सरपंचाच्या हस्ते अर्पण केली जाते. प्रत्यक्षात पोलिसांनी छापा मारून दारू जप्त केली व सरपंचाला तुरुंगात पाठवले. यामुळे लग्न थांबले. दिनेश मुर्मू यांची बहीण बासमती मुर्मूचे लग्न अरविंद मरांडीशी ठरलेले आहे. ५ एप्रिल रोजी वरात गावात आली. आदिवासी परंपरेनुसार सरपंच गोपाळ सोरेन यांनाच लग्नाचे विधी पूर्ण करायचे होते. तेवढ्यात तेथे पोलीस आले व घरात दारू सापडल्याचा आरोप करून त्यांनी सोरेन यांना अटक केली. सरपंचाशिवाय आदिवासी समाजात लग्नाचे विधी होत नाहीत. देवी-देवतांना नैवेद्य म्हणून जवळपास दोन लीटर दारू घरात ठेवली गेली होती. परंतु, पोलिसांचे म्हणणे १३ लीटर दारू जप्त केली. सरपंच आल्यानंतरच लग्न होईल, असे म्हटले जात आहे. वराकडील लोक गावात थांबलेले आहेत. परंपरा अशी की, लग्नानंतरच वर पत्नीला घेऊन गावात प्रवेश करू शकतो, नाही तर युवतीला विधवा घोषित करावे लागेल. त्यामुळे वधूचे वडील अस्वस्थ आहेत.
दिनेश मुर्मू यांचे वडील रसिकलाल मुर्मू यांनी सर्व मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बासमतीचे लग्न होऊ देण्याची मागणी केली आहे. आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी विभागीय कार्यालयात गटविकास अधिकारी अभिनव भारती यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला आहे. माजी आमदार संजय कुमार यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक संजय कुमार म्हणाले,“ दारूबंदी कायद्याचे कठोरपणे पालन केले जात आहे. दारूबंदी कायद्यात कोणत्याही विशिष्ट जातीसाठी वेगळी तरतूद नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच आहे. लग्न होणे किंवा थांबणे हा त्यांचा प्रश्न आहे.”