महाराष्ट्र, उत्तर भारतात लग्नं जास्त टिकतात
By Admin | Published: January 18, 2016 09:58 AM2016-01-18T09:58:46+5:302016-01-18T12:17:00+5:30
पूर्वेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्र, उत्तर भारतातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - उत्तर भारतातील पंजाबपासून बिहार पर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. पंजाब, बिहार, महाराष्ट्र येथे ११-१२ टक्के जोडप्यांचं लग्न ४० वर्षांहून अधिक काळ टिकतं तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अवघं ७ टक्के आहे. मेघालयमध्ये तर अवघे ४.१ टक्के जोडपी ४० वर्षांहून अधिक काळ लग्नबंधनात आहेत. हरियाण वा महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा एक-तृतियांश आहे.
संपूर्ण देशभरात एकूण १० टक्के जोडप्यांची लग्नं ४० वर्षांहून अधिक काळ टिकली आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लग्न किती वर्ष टिकतं याचं प्रमाण प्रेम, एकनिष्ठता यापेक्षा रिती-रिवाज, परंपरा आणि प्रकृती, स्वास्थ्यावर जास्त अवलंबून असतं. तसेच त्या जोडप्याचं लग्न कितव्या वर्षी झालं आणि ते किती काळ जगले हेही लग्न टिकण्याच्या कालावधीतील महत्वाचे मुद्दे आहेत. सध्या नागरिकांचे आयुष्यमान वाढले असल्याने, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा कालावधीही वाढतो.
उत्तर भारतात तरूण-तरूणींचं लग्न कमी वयातच केलं जातं आणि त्यांच आयुष्य जास्त असल्याने त्यांचे वैवाहिक जीवनही बराच काळ टिकतं. तर पूर्वैकडील राज्यांमध्ये अगदी उलटी परिस्थिती आहे, तेथे लग्न उशीरा लावली जातात. हरिणायात २१ टक्के पुरूषांचं लग्न २१ व्या वर्षाच्या आधीच होऊन जातं, पण मेघालयमध्ये हाच आकडा अवघा ११ टक्के आहे. तर हरियाणात ३८ टक्के महिलाचं लग्न १८ वर्षांआधीच होत आणि मेघालयात तीच टक्केवारी अवघी १५ टक्क असल्याचे दिसून आले आहे.
जास्त काळ लग्न टिकणारी राज्यं ( ४० वर्षे वा अधिक) -
हरियाणा - ११.६ %
महाराष्ट्र - ११.६%
उत्तर प्रदेश - ११.६%
मध्य प्रदेश - ११.५%
राजस्थान - ११.२%
कमी वर्ष लग्न टिकणारी ५ राज्यं :
दादरा आणि नगर हवेली - ५.४%
आसाम - ५.२ %
नागालँड - ४.८ %
अरूणाचल प्रदेश - ४.७%
मेघालय - ४.१%