फेसबुकवरील ऑनलाइन प्रेमातून ठरलेले लग्न मोडणारच - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 04:50 PM2018-01-26T16:50:38+5:302018-01-26T16:51:40+5:30
फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे.
नवी दिल्ली - फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे. गुजरातमधील एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे मत मांडले आहे. पती-पत्नीने संमतीने घटस्फोट घ्यावा, असेदेखील हायकोर्टाने सांगितले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील नवसारीत राहणाऱ्या तरुणाची राजकोटमधील एका तरुणीशी 2014 मध्ये सोशल मीडिया फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि दोघांनीही 2015 मध्ये लग्नदेखील केले. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतरच दोघांमध्ये वादावादी होऊ लागली.
वाद विकोपाला गेल्यानं तरुणी माहेरी निघून गेली. तिने पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. 2016 मध्ये तरुणाच्या कुटुंबीयांनी याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. आमच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर गुरुवारी (25 जानेवारी) हायकोर्टाने निर्णय दिला.
दरम्यान, हायकोर्टाने या दाम्पत्याला सांमजस्याने वादावर तोडगा काढायला सांगितले. 'आधुनिक काळात फेसबुकद्वारे लग्न ठरु लागली आहेत, पण ती फार काळ टिकणार नाही', असे निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवलं.
दरम्यान, हायकोर्टाने पतीच्या कुटुंबीयांना आरोपांमधून मुक्त केले. पतीला लक्ष्य करण्यासाठीच तरुणीने हा गुन्हा दाखल केला, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तरुणीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सासरच्या मंडळींनी तरुणीचा छळ केला नसेलही. मात्र तिच्या पतीने छळ केला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातील गुन्हा रद्द करु नये, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर हायकोर्टाने तरुणाविरोधातील गुन्हा रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले.