विवाहितांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त
By admin | Published: August 21, 2015 10:29 PM2015-08-21T22:29:57+5:302015-08-21T22:29:57+5:30
भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या
इंदूर : भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या तुलनेत विवाहितांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) एका अहवालात ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार इ.स.२०१४ साली आत्महत्या करणाऱ्या एकूण लोकांपैकी ६५.९ टक्के विवाहित होते, तर २१.१ टक्के आत्महत्याग्रस्तांचे लग्न झाले नव्हते. आत्महत्या करणारे १.४ टक्के लोक घटस्फोटित अथवा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले होते.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभय जैन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही आकडेवारी भारतीय कुटुंब व्यवस्थेतील गंभीर बदलाचे संकेत देत असल्याचे स्पष्ट केले.
विवाहितांमधील वाढत्या आत्महत्यांची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, देशात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत असून विभक्त कुटुंबांकडे अधिक कल आहे. यामुळे कुटुंबातील संघर्ष वाढत असून व्यक्तिगत सहनशीलता सातत्याने कमी होत आहे. विभक्त कुटुंबात राहणारे दाम्पत्य आपल्या व्यावसायिक आणि खासगी समस्यांबद्दल एकमेकांसोबत मनमोकळी चर्चा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एकट्याने समस्यांना तोंड देत असल्याने ते नैराश्यग्रस्त होत आहेत आणि शेवटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. (वृत्तसंस्था)