वयाच्या ७ व्या वर्षी घरच्यांनी बळजबरीनं लग्न लावलं; १२ वर्षानंतर ‘ती’ची वनवासातून सुटका झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 03:44 PM2021-09-06T15:44:43+5:302021-09-06T15:46:41+5:30
भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं.
राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात १९ वर्षीय बालिका वधूनं केवळ ७ वर्षाची असताना लग्न केले होते. अखेर १२ वर्षांनी बालविवाहच्या जाळ्यातून ती सुखरुप सुटली. बालवधू मानसीने भीलवाडा येथील फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. बालविवाह रद्द व्हावा अशी मागणी करणारी याचिका तिने कोर्टात दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश हरिवल्लभ खत्री यांनी तिची दुर्दशा ऐकून संवेदनशीलपणे निर्णय सुनावला. मानसीचा बालविवाह रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोर्टाने बालविवाह विरोधात चांगलीच चपराक दिली आहे.
वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न
भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं. जवळपास १२ वर्ष तिला बालविवाहाचा फटका बसला. या काळात पंचायत आणि अन्य जातीकडून तिच्या गौना(विवाहातील एक समारंभ) करण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. इतकचं नाही तर तिच्या कुटुंबालाही धमकी दिली होती.
फॅमिली कोर्टात पोहचला बालविवाह रद्द करण्याचा खटला
याच दरम्यान, मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी सारथी ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या डॉ. कृती भारती यांच्या अभियानाविषयी माहिती मिळवली. त्यानंतर लग्न रद्द करण्यासाठी मानसीने त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कृती जोधपूर ते भीलवाडा आल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यात मानसीने बालविवाह रद्द करण्यासाठी फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले. डॉ. कृती भारती मानसीसोबत भीलवाडा येथील फॅमिली कोर्टात पोहचल्या तिथे कोर्टाला बालविवाहाशी निगडीत काही पुरावे सादर केले.
न्यायाधीशांनी सुनावला ऐतिहासिक निर्णय
फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचं लग्न रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १२ वर्षापूर्वी वयाच्या ७ व्या वर्षी मानसीचं लग्न झालं होतं. आदेशात मानसीला बालविवाहाच्या बंधनातून मुक्त करण्यात आले. बालविवाहामुळे मुलांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब होते असं कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या निर्णयावर मानसी म्हणाली की, डॉ. कृती भारती यांच्यामुळे बालविवाहाच्या वनवासातून माझी सुटका झाली. मी बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मला यापुढे शिक्षण सुरुच ठेवायचं आहे. मला शिकून शिक्षक बनायचं आहे असं ती म्हणाली.