विवाहित- अविवाहितांचे सहजीवन बेकायदा, राजस्थान उच्च न्यायालयाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:50 AM2021-06-12T06:50:02+5:302021-06-12T06:50:43+5:30
Rajasthan High Court : जयपूर जिल्ह्यातील हेमंतसिंग राठोड हे ३१ वर्षीय विवाहित गृहस्थ २९ वर्षीय अविवाहित महिलेसोबत राहू लागले. मुलीच्या आई-वडिलांपासून संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.
- डॉ. खुशालचंद बाहेती
जयपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने विवाहित पुरुषाचे अविवाहित महिलेसोबत सहजीवन (लिव्ह इन रिलेशनशिप) असणाऱ्या जोडप्यास संरक्षण नाकारले आहे. या सहजीवनास कायदेशीर मान्यता नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
जयपूर जिल्ह्यातील हेमंतसिंग राठोड हे ३१ वर्षीय विवाहित गृहस्थ २९ वर्षीय अविवाहित महिलेसोबत राहू लागले. मुलीच्या आई-वडिलांपासून संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. राजस्थानचे पोलीस महासंचालक व जयपूर पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, असे आदेश द्यावेत, अशी विनंती उच्च न्यायालयास करण्यात आली होती. हा अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने कायद्यास अशा प्रकारचे सहजीवन मान्य नाही, असे मत व्यक्त केले.
असे लग्न करता येणार नाही
सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये सहजीवनास कायदेशीर मान्यता दिली होती. यामध्ये सहजीवन करणाऱ्याचे वय कायदेशीरदृष्ट्या लग्नाचे असावे तसेच दोघेही एकमेकांशी विवाह करण्यास कायद्याने सक्षम असावेत, असे नमूद केले आहे. या प्रकरणात पुरुष विवाहित असल्याने तो अविवाहित स्त्रीसोबत लग्न करण्यास पात्र नाही. हे सहजीवन कायदेशीर नाही, असे न्या. पंकज भंडारी म्हणाले.