देशातील हवाई दलाचे महान योद्धे मार्शल अर्जन सिंह पंचत्वात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:13 AM2017-09-19T04:13:56+5:302017-09-19T04:14:30+5:30
देशातील हवाई दलाचे महान योद्धे मार्शल अर्जन सिंह यांच्यावर, दिल्लीच्या ब्रार चौकात सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक राजकीय नेते व तिन्ही दलांचे प्रमुख आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत, अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अर्जन सिंह यांना तोफांची सलामी देण्यात आली आणि भारतीय हवाई दलाच्या तीन सुखोई लढाऊ विमानांनी फ्लाई पास्ट करून, हवाई दलाचे एकमेव पाचव्या रँकचे मार्शल अर्जन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुखोई विमानांनी ‘मिसिंग मॅन फॉर्मेशन’बनविले. हवेत बनविले जाणारे हे फॉर्मेशन, दिवंगत सैन्य अधिका-यांच्या सन्मानार्थ बनविण्यात येते. राजधानी दिल्लीत सर्व सरकारी इमारतींवरील तिरंगा सोमवारी अर्ध्यावर फडकाविण्यात आला. पंजाबमध्ये राज्य सरकारने तीन दिवसांचा शोक जाहीर केला आहे. त्यांच्या पश्चात एक
मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचे २०११ मध्ये निधन झाले होते.