मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:41 AM2024-05-06T05:41:50+5:302024-05-06T05:42:09+5:30
दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, अनेक जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विकी पहाडे मंगळवारी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी परतणार होते. ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नोनिया-करबल गावचे रहिवासी होते. दरम्यान, दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, अनेक जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
विकी पहाडे गेल्या महिन्यात त्यांच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी घरी परतले होते. तेव्हाच त्यांची कुटुंबीयांशी भेट झाली होती. त्यानंतर ते १८ एप्रिल रोजी आपल्या तुकडीत पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. शनिवारी पूंछमध्ये आयएएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पहाडे शहीद झाले तर इतर पाच आयएएफ जवान जखमी झाले. पहाडे यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे.
हवाई दलाची श्रद्धांजली
विकी पहाडे (३३) हे २०११ मध्ये भारतीय हवाई दलात (आयएएफ) रुजू झाले होते. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत एक्स हँडलवर हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि हवाई दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम
nदहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
nलष्कराने हेलिकॉप्टर वापरून हवाई देखरेखही केली. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शाहसीतार, गुरसाई, सनई आणि शेंदरा टॉप यासह अनेक भागात लष्कर आणि पोलिसांची सुसंघटित संयुक्त मोहीम सुरू आहे.
वर्षातील पहिली मोठी घटना : हल्ल्यानंतर हल्लेखोर जंगलात पळून गेल्याचे समजते. त्यांनी अमेरिका निर्मित एम-४ कार्बाइन व स्टीलच्या गोळ्यांचा वापर केला. ही या वर्षातील जम्मू प्रदेशातील पहिली मोठी दहशतवादी घटना आहे.