'शहीद भगतसिंगचा पुतण्या आंदोलनात सहभागी, त्याला देशद्रोही कधी म्हणणार?'
By महेश गलांडे | Published: December 26, 2020 05:47 PM2020-12-26T17:47:18+5:302020-12-26T17:49:23+5:30
नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत
मुंबई - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या ३० व्या दिवशी शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सर्वच सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शुक्रवारी यूपी गेटवर आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येत जाट शेतकरी पोहोचले. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यातच, शेतकऱ्यांच्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून हुतात्मा भगतसिंह यांचा पुतण्याही या आंदोलनात सहभागी झाला आहे.
नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत. कायदे मागे घ्यावे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते, अशी शक्यता असल्याने सर्वच सीमांवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या सूचना विविध राज्यांतील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, दुसरीकडे दिवसेंदिवस आंदोलन ठिकाणी गर्दी वाढत असून शेतकऱ्यांचा आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनास जगभरातील भारतीय नागरिक पाठिंबा देत आहेत, आज ऑस्ट्रेलियातून क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या नागरिकांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. सेलिब्रिटींपासून ते अनेक दिग्गजांकडून या आंदोलनास पाठिंबा देण्यात येत आहे, तसेच मदतही पुरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ख्रिसमसदिवशी या आंदोलनात हुतात्मा भगतसिंह यांचा पुतण्याही सहभागी झाल्याची माहिती आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी ट्विट करुन या आंदोलनात हतात्मा भगतसिंह यांचा पुतण्या सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, आता चड्डीवाले त्याला देशद्रोही कधी म्हणणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आरएसएस आणि भाजपाला लक्ष्य केलंय.
हुतात्मा भगतसिंगचा पुतण्या काल शेतकरी आंदोलनात सहभागी झाला...
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) December 26, 2020
चड्डीवाले आता त्याला देशद्रोही कधी म्हणणार?
दरम्यान, भाई जगताप यांनी शहीद भगतसिंग यांच्या पुतण्याबद्दल सविस्तर माहिती ट्विटवरुन दिली नाही.
आधी गोदाम नंतर कायदे -टिकेत
मुरादाबाद येथील इकरोटिया टोल प्लाझावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी हे कायदे केवळ उद्योगपतींच्या सेवेसाठी मोदींनी बनविले आहेत. हे उद्योगपती धान्यांची साठेबाजी करण्यासाठी आधी गोदामे उभारतात. त्यानंतर हे कायदे शेतकऱ्यांवर लादले जातात, यातूनच मोदींची नीती स्पष्ट होते, अशी टीका केली.
कायद्याचा एकतरी फायदा सांगा - केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करीत केंद्र सरकारला या कायद्याचे फायदे विचारले. एक तरी फायदा सांगावा असे त्यांनी आवाहन केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ नुकसानच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दिल्ली- जयपूर मार्ग जाम
आंदोलनाच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी शुक्रवारी दिल्ली- जयपूर मार्गावरील रेवाडी येथे उतरले. राष्ट्रीय महामार्गावर जाम लागला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे आहे; परंतु हरयाणा पोलिसांनी त्यांना अडवले असल्याने शेतकऱ्यांनी जागेवरच धरणे दिलेत.