'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', फेसबुकवर लिहिलेलं ते वाक्य शहीद कपिल कुंडू यांनी खरं करुन दाखवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:45 AM2018-02-05T11:45:05+5:302018-02-05T11:46:23+5:30
आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे
नवी दिल्ली - राजेश खन्ना यांचा 'आनंद' चित्रपटातील सुपरहिट डायलॉग 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आयुष्याचा थोडक्यात अर्थ सांगणारा हा डायलॉग शहीद कपिल कुंडू यांना खरा करुन दाखवला आहे. सीमारेषेवर शहीद झालेल्या 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांचं आयुष्य अगदी या डायलॉगप्रमाणेच होतं. जानेवारी महिन्यात कॅप्टन म्हणून तैनात करण्यात आलेले कपिल कुंडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या इंट्रोमध्येही हीच लाइन लिहिली होती.
फेसबुकवर आपली ओळख लिहिताना अनेकजण एखाद्या चित्रपटातील डायलॉग चिकटवतात. पण शहीद कपिल कुंडू यांनी आनंद चित्रपटातील 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए' हा डायलॉग फक्त लिहिला नाही, तर तो जगूनही दाखवला. फक्त 23 व्या वर्षी शहीद झालेल्या कपिल कुंडू यांचं आयुष्य फक्त 23 वर्षांचं राहिलं, पण देशासाठी शहीद होत ते मोठं काम करुन गेले आहेत ज्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या त्यांचं नाव लक्षात ठेवलं जाईल.
पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासहित तीन जवान शहीद झाले. कॅप्टन कपिल कुंडू फक्त 23 वर्षांचे होते आणि गुरुग्रामजवळील रनसिका गावचे रहिवासी होते. आपल्या विधवा आईचा एकमेव आधारदेखील तेच होते. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. आधी पती आणि आता मुलगा गेल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे ती पोकळी निर्माण झाली आहे. कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. कॅप्टन कपिल कुंडूदेखील गेल्या काही दिवसांपासून राजौरी येथे तैनात होते. कॅप्टन कपिल कुंडू यांना दोन मोठ्या बहिणी असून त्यांचं लग्न झालं आहे.
कॅप्टन कपिल कुंडू यांचं शिक्षण पटोदी जिल्ह्यातील डिव्हाइन डेल इंटरनॅशन स्कूलमध्ये झालं आहे. 2012 मध्ये एनडीएसाठी त्यांची निवड झाली, जिथून भारतीय लष्करासाठी ते निवडले गेले. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली होती. ट्रेनिंगदरम्यानही त्यांचे हे देशप्रेम वारंवार दिसून यायचं.
आजोबा म्हणतात आमचा एकुलता एक नातू गेला, आम्ही सगळंच गमावून बसलो
शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक आव्हान करताना म्हटलं की, 'आमचा नातू सीमेवर शहीद झाला याचा अभिमान आहे. तो आमचा एकुलता एक नातू होता, आम्ही सगळंच गमावून बसलोय. तुम्ही याचा बदला घेतला पाहिजे, फक्त दिलासा देऊन काम चालणार नाही'.