'एक काय 4 मुलं असती तरी त्यांना सैन्यात पाठवलं असतं'; शहीद योगेशच्या वडिलांचा देशाभिमान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:02 PM2023-09-18T13:02:40+5:302023-09-18T13:03:24+5:30
योगेश कुमार यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अनंतनागमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईत लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले लान्स नाईक योगेश कुमार यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चुरू येथील रहिवासी योगेश कुमार यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अनंतनागमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईत लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली.
योगेश शहीद झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. 14 आरआरचे लान्स नाईक योगेश कुमार 9 वर्षांपूर्वी क्रीडा कोट्यातून सैन्यात दाखल झाले होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या हौतात्म्यानंतर पृथ्वी सिंह म्हणाले की, मला 4 मुलं असती तरी त्या सर्वांना मी देशसेवेसाठी पाठवले असते, आता मी माझ्या नातवाला सैन्यात भरती होण्यासाठी तयार करेन.
शहीद योगेश कुमारचे काका रणधीर सिंह यांनी सांगितले की, योगेशला 2013 मध्ये 18 केवलरी बटालियन (I) मध्ये स्पोर्ट्स कोट्यातून हवालदार पदावर भरती करण्यात आले होते. योगेशचे आजोबाही सैन्यात होते. अनंतनागमध्ये शोध मोहिमेत शहीद झालेल्या योगेश कुमारचा मित्र धर्मेंद्र चिंपी यांनी सांगितले की, योगेश खूप शूर आणि धाडसी होता.
शनिवारी रात्री शोध मोहिमेदरम्यान योगेश कुमार हे टेकडीच्या माथ्यावर तैनात होते आणि दुपारी 11.30 ते 12 च्या दरम्यान त्यांची दहशतवाद्यांशी थेट चकमक झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात योगेश शहीद झाले होते. लष्कराचे अधिकारी कॅप्टन दिलीप सिंह यांनी सांगितले की, शहीद योगेश यांचे पार्थिव सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता दिल्ली आणि दुपारी अडीच वाजता राजगड येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
पृथ्वी सिंह यांच्या पोटी जन्मलेला शहीद योगेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शनिवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. योगेशच्या मागे चार वर्षांचा मुलगा आणि नऊ महिन्यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी आरोग्य विभागात जीएनएम पदावर कार्यरत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.