56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:50 PM2024-10-02T14:50:55+5:302024-10-02T14:52:36+5:30
7 फेब्रुवारी 1968 रोजी घडलेल्या विमान अपघात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
सहारनपूर : जगात अनेकदा अशा घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. भारतीय सैन्यातील सैनिकांना हौतात्म्य आल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सियाचीनच्या ग्लेशियरजवळ भारतीय हवाई दलातील जवानाचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जवानाचा मृत्यू 56 वर्षांपूर्वी झालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सियाचीनमध्ये सापडलेला मृतदेह उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नानौता भागात राहणाऱ्या हवाई दलाच्या जवानाचा आहे. मलखान सिंग असे या जवानाचे नाव असून, 56 वर्षांपूर्वी विमान अपघातात या जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्या जवानाचा मृतदेह सापडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गुरुवारी(2 ऑक्टोबर) त्यांचे पार्थिव गावी दाखल झाले आणि कुटुंबीयांनी रीतिरिवाजानुसार त्यावर अंतिम संस्कार केले. आश्चर्याची बाब म्हणजे बर्फात गाडल्या गेल्याने मृतदेह खराब झालेला नव्हता.
मलखान सिंग शहीद झाले, तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होता. त्यांच्या पश्चात पत्नी शिलादेवी आणि दीड वर्षाचा मुलगा राम प्रसाद होता. मात्र, आता त्यांची पत्नी आणि मुलगा मरण पावल्यामुळे नातवाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मलखान यांच्या मृत्यूनंतर शिलादेवीने मलखान यांचा धाकटा भाऊ चंद्रपाल यांच्याशी विवाह केला. पण, चंद्रपाल यांचाही मृत्यू झाला आहे. आता कुटुंबामध्ये मलखान यांचे नातू आहेत.
अपघाताच्या दिवशी काय झाले?
7 फेब्रुवारी 1968 रोजी एएन-12 विमान चंदीगडहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले. रोहतांग खिंडीजवळ हवामान खराब झाल्यामुळे विमान क्रॅश झाले होते. यात 100 हून अधिक जवान शहीद झाले होते. हा बर्फाच्छादित पर्वतीय भाग असल्याने मृतदेह बाहेर शोधणे शक्य नव्हते. हे काम इतके अवघड आहे की, 2019 पर्यंत केवळ पाच मृतदेह सापडले. नुकतेच आणखी चार मृतदेह सापडले, त्यापैकी एक मलखान सिंग यांचा आहे.