Independence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:44 PM2018-08-14T18:44:48+5:302018-08-14T18:47:53+5:30
सुट्टीवर असलेल्या औरंगजेब यांची घरी परतत असताना हत्या झाली होती
नवी दिल्ली: दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालं आहे. औरंगबेज यांच्या शौर्याचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याबद्दलची घोषणा झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब यांना वीरमरण आलं होतं.
याच वर्षी 15 जूनला ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता. ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन टॅक्सी पकडली होती. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते.
Major Aditya Kumar (Garhwal Rifles) and Rifleman Aurangzeb (posthumously) to get Shaurya Chakra. #IndependenceDay2018pic.twitter.com/RHnGus3pCH
— ANI (@ANI) August 14, 2018
शोपियानला जात असलेल्या औरंगजेब यांची टॅक्सी दहशतवाद्यांनी कालम्पोरा गावाजवळ अडवली आणि त्यांचं अपहरण केलं. याची माहिती टॅक्सी चालकानं पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आणि लष्करानं संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी औरंगजेब यांचा मृतदेह कालम्पोरापासून 10 किलोमीटर अंतरावर आढळून आला. दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली होती. औरंगजेब जम्मू-काश्मीर लाईट इन्फंटरीच्या शादीमार्ग येथे असलेल्या 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते.