हा तर शहिदाचा अपमान, मंत्री रॅलीवरुन येताच CRPF निरीक्षकाच्या कुटुंबानं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:33 PM2019-03-04T15:33:52+5:302019-03-04T15:35:32+5:30
रॅलीला महत्त्व देणाऱ्या नेत्यांची शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडून कानउघाडणी
पाटणा: दहशतवाद्यांविरोधात लढताना हौतात्म्य पत्करलेल्या सीआरपीएफ निरीक्षकाच्या अंतिम दर्शनाला येण्यासाठी वेळ नसलेल्या मंत्र्यांना शहीद निरीक्षकाच्या कुटुंबानं चांगलंच सुनावलं. तुम्ही इतक्या उशिरा शहीद झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत. हा त्या शहिदाचा अपमान आहे, अशा शब्दांमध्ये निरीक्षकाच्या नातेवाईकांनी मंत्र्यांची कानउघाडणी केली.
#WATCH BJP Min Vijay Sinha visited residence of CRPF Inspector Pintu (who lost his life in Handwara encounter on Mar 1) in Begusarai late-night y'day. A family member of the CRPF personnel says, 'This doesn't work, you came so late to pay tributes. It's a martyr's insult.' #Biharpic.twitter.com/aIeJMyPzZ8
— ANI (@ANI) March 4, 2019
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेल्या सीआरपीएफ निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव काल सकाळी पाटण्यात आणण्यात आलं. मात्र त्यावेळी विमानतळावर राज्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता. राजधानी पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं एनडीएचे नेते, राज्याचे मंत्री व्यस्त होते. याबद्दल शहीद निरीक्षकाच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते आणि मंत्री विमानतळावर आले होते. मात्र त्याच्या काही वेळ आधी हुतात्म्याचं पार्थिव आणलं जात असताना एकही नेता विमानतळाकडे फिरकला नाही.
काल पाटण्यात पंतप्रधान मोदींची संकल्प रॅली होती. त्यामुळे बिहारच्या सत्ताधाऱ्यांनी पिंटू कुमार सिंह यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवली. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एकही बिहार, जेडीयूचा एकही नेता उपस्थित राहिला नाही. संकल्प रॅलीनंतर बिहारचे मंत्री आणि भाजपा नेते विजय सिन्हा शहीद सीआरपीएफ निरीक्षकाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले. काल रात्री सिन्हा यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शहिदाच्या कुटुंबीयांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं.
आमच्या सहवेदना तुमच्यासोबत आहेत. त्यामुळेच तर तुमची भेट घेण्यासाठी आलो, अशी सारवासारव भाजपाच्या मंत्र्यांनी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुटुंबानं आपला संताप व्यक्त केला. त्यावर रॅली संपल्या संपल्या तुमची भेट घेण्यासाठी आलो, असं थातूरमातूर स्पष्टीकरण देत सिन्हा यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शहीद निरीक्षकाच्या कुटुंबानं त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. 'तुम्ही इतक्या उशीरा येत आहात. याला अर्थ नाही. हा शहिदाचा अपमान आहे,' अशा शब्दांमध्ये कुटुंबीयांनी त्यांचा संताप व्यक्त केला.