शहीद होण्यापूर्वी अधिकाऱ्याने काश्मीरमध्ये फडकावला तिरंगा
By Admin | Published: August 17, 2016 04:40 AM2016-08-17T04:40:15+5:302016-08-17T04:40:15+5:30
स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती अभिमानाने भरून आली होती. ‘आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे’ हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले. कारण, झेंडावंदनांनंतर ते एका आॅपरेशनसाठी रवाना झाले आणि अतिरेक्यांशी लढताना झारखंडचा हा वीरपुत्र शहीद झाला. तत्पूर्वी दोन अतिरेक्यांचा खात्मा करुन कुमार यांनी आपले कर्तव्यही पूर्ण केले.
प्रमोद कुमार यांना जुलै महिन्यातच बढती मिळाली होती आणि त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली होणार होती. बदली न झाल्यामुळे ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. बदली वेळेत झाली असती, तर ते नक्कीच बचावले असते. त्यांच्या मुलीचा कालच वाढदिवस होता.
त्यांच्या पत्नी नेहा यांच्या सांगण्यानुसार प्रमोद कुमार व नेहा यांचे काल सकाळी मोबाइलवर संभाषण झाले होते. आपण कामात व्यग्र आहोत, नंतर फोन करतो, असे ते पत्नीला म्हणाले होते. पुन्हा पत्नीने फोन केला, तेव्हा त्याच्या मोबाइलची बेल वाजत होती. पण मोबाइल बराच वेळ उचलला गेला नाही. त्यामुळे नेहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधला, तेव्हा ते किरकोळ जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुन्हा काही तासांनी फोन केला, तेव्हा त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याची बातमी कळली. पण शस्त्रक्रियेनंतरही ते जगू शकले नाहीत.
४४ वर्षीय कुमार यांनी सकाळी ८.३० च्या सुमारास झेंडा फडकावला. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापनदिनी सुरक्षा दलाची जबाबदारी वाढली आहे, असेही ते आपल्या या शेवटच्या भाषणात म्हणाले. १९९८ मध्ये ते नोकरीत रुजू झाले होते. सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलात कमांडिंग आॅफिसर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, झेंडावंदनानंतर नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, नौहट्टा भागात अतिरेकी घुसले आहेत. ते तात्काळ एका बुलेटप्रूफ वाहनातून मोहिमेवर रवाना झाले. यावेळी त्यांचे काही सहकारीही सोबत होते.
नौहट्टा भागात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या मानेच्या वरच्या बाजूला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. कुमार यांच्या पश्चात पत्नी नेहा आणि सातवर्षीय मुलगी आर्ना असा परिवार आहे. २०११, २०१४ आणि २०१५ मध्ये ‘सीआरएफकडून’ कुमार यांना विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. या चकमकीत अन्य नऊ जवान जखमी झाले आहेत. झारखंडच्या जमताडा जिल्ह्यात कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.