कार भाडेपट्ट्यावर देण्याची ‘मारुती’ची योजना; कंपनी थेट ग्राहकांना देणार वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:56 PM2020-05-29T23:56:47+5:302020-05-30T06:17:42+5:30
नव्या संकल्पनेसाठी देशभरातील डीलरांच्या नेटवर्कचा करणार वापर
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे नव्या विस्तार योजनेचा भाग म्हणून ‘मारुती सुझुकी इंडिया’ने (एमएसआय) किरकोळ ग्राहकांना (रिटेल कस्टमर) कार भाडेपट्ट्यावर (लिजिंग) देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. देशभरातील आपल्या डीलरशिप नेटवर्कचा वापर करून मारुती सुझुकी ही योजना राबविणार आहे.
कंपनीशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, मागील वर्षभरापासून या योजनेवर कंपनी काम करीत असून, विशेष प्रकल्प पथकाच्या देखरेखीखाली यासंबंधीची योजना आखली जात आहे. ह्युंदाई आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यासारख्या मारुतीच्या स्पर्धक कंपन्यांनी कार भाडेपट्ट्यावर देण्याचा व्यवसाय यापूर्वीच सुरू केला आहे. त्यासाठी या कंपन्यांनी रेव आणि झुमकार यासारख्या कंपन्यांशी भागीदारी केलेली आहे.
मारुतीचीही झुमकारसोबत भागीदारी असली तरी केवळ औद्योगिक क्षेत्रालाच यातून भाडेपट्ट्याने गाड्या दिल्या जातात. सामान्य ग्राहकांसाठी ही सेवा नाही. आता सामान्य ग्राहकांसाठी भाडेपट्टा सेवा सुरू करण्याचा विचार मारुतीने चालविला आहे.
मारुतीची कार भाडेपट्टा योजना कधी सुरू होणार याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. तथापि, सूत्रांनी सांगितले की, मारुती सध्या झुमकारसारख्या प्लॅटफॉर्मला गाड्या पुरविते. हे प्लॅटफॉर्म उद्योगांना भाडेपट्ट्यावर गाड्या देतात. यात कंपनीला मिळणारा लाभ मर्यादित आहे. याऐवजी कंपनीने आपल्या डीलरांमार्फत स्वत:च ग्राहकांना गाड्या भाड्याने दिल्यास डीलर आणि कंपनी, असा दोघांनाही लाभ मिळेल, असा विचार केला जात आहे.
सूत्रांनी सांगितले की, आर्थिक मंदी आणि त्यातच कोरोना विषाणूमुळे लागलेले लॉकडाऊन वाहन उद्योगाच्या मुळावर आले आहे. कार भाडेपट्टा योजनेमुळे कंपन्यांना काही प्रमाणात महसूल मिळण्यास मदत होईल. डीलरांचे नुकसानही काही प्रमाणात भरून निघेल.
सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीत भाडे पद्धती उत्तम ठरणार आहे. विशेषत: शहरी ग्राहकांना त्याचा फायदा होईल. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातातील पैसा कमी झाल्यामुळे वाहन खरेदीची त्यांची क्षमता घटली आहे, तसेच कार भाड्याने घेण्याची प्रक्रियाही अधिक सोपी आहे. मारुती सुझुकीने यावर प्रक्रिया देण्यास नकार दिला आहे.
डाटाफोर्स या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, युरोपात कार खरेदी करण्याऐवजी भाडेपट्ट्यावर घेण्याचा कल वाढत चालला आहे. मागील पाच वर्षांत कार भाडेपट्ट्याचा बाजार २.६ दशलक्षावरून ४.० दशलक्षांवर गेला आहे. आज युरोपात नोंदणी होणाऱ्या प्रत्येक चार कारपैकी एक कार भाडेपट्ट्यावरील अथवा किरायावरील असते. २०१४ मध्ये सहा कारमागे एक कार भाडेपट्ट्यावरील अथवा किरायावरील होती.
डाटाफोर्सच्या अहवालानुसार, भागीदारी-अर्थव्यवस्थेचा कल अंशत: बदलत आहे. यात लोक ‘मालकी’कडून ‘वापरा’कडे चालले आहेत. व्याजदर कमी झाल्यामुळे भाडेपट्ट्यावर कार घेणे परवडणारे झाले आहे. स्वत:च्या मालकीची कार असण्यात भांडवली जोखीम असते. भाडेपट्ट्यावरील कारमध्ये ती नसते. ज्यादिवशी आपल्याकडे पैसे नसतील, त्यादिवशी कार कंपनीला परत करता येते. देखभाल दुरुस्तीच्या खर्चातूनही ग्राहकांची सुटका होते.
युरोप, अमेरिकेत मर्सिडीजही मिळते भाडेपट्ट्यावर
अल्पकालीन आणि दीर्घकालीन, अशा दोन पद्धतींनी वाहने भाड्याने दिली जातात. दीर्घकाळासाठी देण्यात येणाºया पद्धतीस भाडेपट्टा (लिजिंग) आणि अल्पकालासाठीच्या पद्धतीस किराया (रेंटिंग), असे म्हटले जाते. भाडेपट्टा संपल्यावर संबंधित कार खरेदी करण्याचा पर्याय कंपन्या ग्राहकांना देतात. दुसरी कार भाडेपट्ट्यावर घेण्याचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध असतो.
अमेरिका आणि युरोपात वाहन भाडेपट्टा पद्धत लोकप्रिय आहे. मर्सिडिज बेंझ आणि बीएमडब्ल्यू यासारख्या जर्मन ब्रँडस्ची भाडेपट्टा सेवा लोकप्रिय आहे. या कंपन्या थेट ग्राहकांना कार भाडेपट्ट्यावर देतात. झुमकार आणि रेव यासारख्या स्टार्टअप कंपन्याही या व्यवसायात आहेत.