मानेसरमधील मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये घुसला बिबट्या; शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 12:20 PM2017-10-05T12:20:30+5:302017-10-05T12:24:00+5:30
गुरूग्राममधील मानेसरमध्ये असलेल्या मारूती सुझुकीच्या प्रकल्पात बिबट्या घुसला आहे.
गुरूग्राम- गुरूग्राममधील मानेसरमध्ये असलेल्या मारूती सुझुकीच्या प्रकल्पात बिबट्या घुसला आहे. गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्या मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये घुसला आहे. फॅक्टरीमध्ये घुसलेल्या बिबट्याचा शोध घेणं सध्या सुरू असून फॅक्टरीमधील कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे.
बिबट्या जेव्हा फॅक्टरीमध्ये घुसला त्यावेळी फॅक्टरीच्या आवारात कर्मचारी उपस्थित नव्हते. पण प्रकल्पातील सुरक्षा रक्षक आणि वाहतूक विभागाचे काही कर्मचारी कार्यालायात होते. फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बचाव करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. फॅक्टरीच्या इंजिन रूमच्या बाजूला बिबट्या असल्याचं पाहायला मिळालं. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बिबट्याचा शोध सुरू आहे. तसंच बिबट्या नेमका आला कुठून? याचाही तपास केला जातो आहे.
गुरूवारी सकाळी बिबट्या मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये शिरल्याने मॉर्निंग शिफ्टसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना फॅक्टरीत जाण्यास मनाई केली असून जवळपास 2 हजार कर्माचारी फॅक्टरीच्या बाहेर उभे आहेत.
फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फॅक्टरी परिसर रिकामा करून सिल केला आहे. बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून 100 पोलीस घटनास्थळी तैनात असल्याचं पोलीस अधिकारी अशोक बक्षी यांनी सांगितलं.
दरम्यान, फॅक्टरीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मारूतीच्या अधिकाऱ्यांकडून बैठक घेतली जाणार आहे.