काँग्रेसशी सहकार्यावर मार्क्सवादींमध्ये मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:46 AM2017-12-11T01:46:26+5:302017-12-11T01:46:47+5:30
भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राजकीय समझोता करायचा की नाही, याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राजकीय समझोता करायचा की नाही, याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही. पक्षाच्या २२व्या राष्ट्रीय काँग्रेसपुढे आगामी तीन वर्षांच्या पक्षाच्या ध्येयधोरणांसंबंधी सादर करायचा राजकीय अहवाल या मतभेदांमुळे तयार होऊ शकला नाही.
पॉलिट ब्युरोच्या दोन दिवस येथे झालेल्या बैठकीत सरचिटणीस सीताराम येचुरी व माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी सादर केलेल्या दोन स्वतंत्र टिपणांवर चर्चा झाली. राजकीय अहवालाचा कच्चा मसुदा व त्यावर पॉलिट ब्युरोमध्ये झालेली चर्चा आता कोलकाता येथे १९ ते २१ जानेवारी या दरम्यान होणाºया केंद्रीय समितीपुढे सादर केली जाईल, असे पक्षाने एका निवेदनात नमूद केले.
पक्षाच्या सूत्रांनुसार येचुरी गटाचे असे म्हणणे आहे की, निवडणुकीत पक्षाने काँग्रेसशी कोणताही उघड समझोता करू नये. मात्र, मोदी सरकार हटविण्यासाठी सर्व बिगर डाव्या पक्षांशी सहकार्याचे दरवाजे उघडे ठेवावेत. पॉलिट ब्युरोमध्ये बहुमत असलेल्या करात गटाचा या भूमिकेस विरोध आहे. त्यांच्या मते काँग्रेसशी समझोता केला नाही, तरी पक्षाने निवडणुकीत प्रादेशिक पक्षांशी समझोता करावा.