Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 04:31 PM2020-03-21T16:31:08+5:302020-03-21T16:35:40+5:30
मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच बॉक्सर आणि राज्यसभेच्या खासदार मैरी कोम यांनी 14-दिवसांचा क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला आहे. मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या.
राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात झाल्या सहभागी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संक्रमित लोकांचे विलगिकरण करण्यात यावे, अशी सूचना जागतीक आरोग्य संघटनेने केली आहे. तसेच सरकारनेही सुरक्षिततेच्या कारणास्तव, जे लोक परदेशातून आले आहेत, त्यांनी 14 दिवसांपर्यंत स्वतःला एकांतवासात ठेवावे, असे सांगितले आहे. मात्र, मेरिकोम या 18 मार्चला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या ब्रेकफास्टमध्ये सहभागी झाल्या. राष्ट्रपती कोविंद यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट केलेल्या चार फोटोंपैकी एकात मेरिकोम दिसत आहेत.
शेअर केलेल्या या फोटोला, राष्ट्रपती कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील खासदारांसाठी ब्रेकफास्टचे आयोजन केले, असे कॅप्शन देण्यात आले होते.
याच दिवशी, भाजप आमदार दुष्यंत सिंह, हे कोरोनाची लागण झालेल्या बॉलीवुड गायक कनिका कपूर यांच्या संपर्कात आले होते. सिंह आता स्व-एकांतवासात आहेत. बॉक्सिंग कोच सँटियागो नीवा यांनी शुक्रवारी म्हटले होते, की जॉर्डनमध्ये गेलेले सर्व भारतीय बॉक्सर्स 14-दिवसांच्या स्व-एकांतवासात आहेत. त्यांनी म्हटले आहे, की आम्ही स्व-एकांतवासासाठी 10 दिसांची योजना आखली होती. मात्र आता ती 14 दिवस करण्यात आली आहे.
मेरी कोमचे स्पष्टिकरण -
मेरी कोम म्हणाल्या, आपण राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात उपस्थित होतो, मी जॉर्डनहून परतल्यापासून घरीच आहे. केवळ राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातच सहभागी झाले. यावेळी मी दुष्यंत सिंह यांना भेटले नाही आणि हस्तांदोलनही केले नाही.