चीनला ज्याचा पुळका, तोच दहशतवादी मसूद अजहर ठरतोय भारतासाठी घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 05:40 AM2019-02-16T05:40:56+5:302019-02-16T05:45:02+5:30
जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे.
नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे. चीनला पुळका असलेला हाच मसूद अजहर भारतासाठी घातक ठरतो आहे.
काश्मीरमध्ये हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेत सक्रीय असलेल्या मसूदला भारतीय जवानांनी १९९४मध्ये अटक केली. त्याच्या सुटकेसाठी अनेकदा दहशतवाद्यांनी प्रयत्नही केले होते. पण, ते फसले होते. त्यानंतर २४ डिसेंबर १९९९ रोजी १८० प्रवासी असलेल्या भारतीय विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. ते विमान कंधार येथे उतरवले. अपहृत विमान प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांना सोडण्याची मागणी केली. सहा दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारताने या तिघांनाही सोडले. प्रवाशांना वाचवले. पण, मसूदने २००० साली ‘जैश’ची स्थापना केली व तिच्यामार्फत काश्मीरमध्ये कारवाया सुरू केल्या. त्याच्या संघटनेने आतापर्यंत भारतात अनेक हल्ले केले आहेत.
खुलेआम फिरतोय पाकिस्तानात
पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने मसूदचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत व्हावा, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली होती. १४ सदस्य देशांनी या मागणीला पाठिंबा दिला होता. पण, चीनने आडकाठी केली. चीनला पुन्हा त्याचा पुळका आला आहे आणि भारतावर हल्ल्यांचे कट रचत सुटलेला मसूद अजहर अजूनही पाकिस्तान खुलेआम फिरतो आहे.
भारतातील कारवाया
श्रीनगरच्या बादामी बाग परिसरातील भारतीय सेनेच्या मुख्यालयावर हल्ला.
जम्मू-कश्मीर सचिवालयाच्या इमारतीवर हल्ला.
२००१ साली स्फोटकांनी भरलेली कार जम्मू-कश्मीर विधानसभेवर धडकवली. यात ३८ लोकांचा मृत्यू झाला होता.
२००१ साली संसदेवर हल्ला.
२०१६ साली पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला.
२०१६ साली उरी येथील लष्करा हेडकॉर्टरवर भल्या पहाटे हल्ला. यात १९ जवान शहीद झाले होते.