मसूद अझहरवरील बंदीसाठी अमेरिकेची UNमध्ये धाव, चीनचा विरोध
By Admin | Published: February 7, 2017 06:28 PM2017-02-07T18:28:53+5:302017-02-07T18:44:40+5:30
अझहरविरोधातील लढ्यात अमेरिकेने भारताच्या पारड्यात आपले वजन टाकत अझहरवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि गतवर्षी पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझहरविरोधातील भारताच्या लढाईला यश मिळण्याची चिन्हे आहेत. अझहरविरोधातील लढ्यात अमेरिकेने भारताच्या पारड्यात आपले वजन टाकत अझहरवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये धाव घेतली आहे. मात्र चीनने नेहमीप्रमाणे आडकाठी करत अझहरवर बंदी घालण्यास विरोध केला आहे.
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाविरोधात घेतलेल्या आक्रमक पावित्र्याला अनुसरून अमेरिकेच्या प्रशासनाने मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात दाखल केला आहे. या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्सने पाठिंबा दिला आहे.
US moves @UN for banning #Pathankot terrorist attack mastermind and Pak-based JeM chief #MasoodAzhar; China opposes
— Press Trust of India (@PTI_News) February 7, 2017
मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून त्याच्यावर बंदी घालण्यासाठी भारताकडून बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अझहरवर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या प्रस्तावाला चीनने अडथळा आणला होता. त्यामुळे त्या प्रस्तावाला तांत्रिक स्थगिती मिळाली होती. नंतर हे प्रकरण थंड झाले होते. मात्र आता अमेरिकेने फ्रान्स आणि ब्रिटनच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीसमोर अझहरविरोधातील नवा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र चीनने या प्रस्तावामध्येही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे.