पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:08 AM2019-09-10T03:08:06+5:302019-09-10T03:08:52+5:30
भारतीय गुप्तचर संघटनांची माहिती
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया घडविण्यास पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला सांगितले आहे. त्यासाठी अजहर व आणखी एका प्रमुख दहशतवाद्याची तुरुंगातून गुपचूप सुटका करण्यात आली आहे. ही माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिली आहे.
यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले की, काश्मीरमध्ये येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत अनेक घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न जैश-ए-मोहम्मदकडून होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी कारबॉम्ब धडकवून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्ताननेमसूद अजहर (५१ वर्षे) व या संघटनेच्या आणखी काही दहशतवाद्यांना अटक केली होती. पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हल्ले चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते.
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता. एफएटीएफच्या जूनमध्ये झालेल्या बैठकीच्या आधी पाकिस्तानने मसूद अजहरला अटक करून दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे नाटक केले होते. मसूद अजहर हा मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचाही सूत्रधार आहे.
सतर्क राहण्याचा सुरक्षा दलांना आदेश
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानला काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण करायची आहे.
३७० कलम रद्द केल्याविरोधात रस्त्यावर उतरून प्रचंड हिंसाचार करण्यासाठी काश्मिरी लोकांची माथी भडकाविण्याचा पाकिस्तानचा कट आहे, असेही भारतीय गुप्तहेर यंत्रणांच्या सूत्रांनी म्हटले आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर अत्यंत सतर्क राहण्याचा आदेश सुरक्षा दलांना केंद्र सरकारने दिला आहे.