मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला, तीन जवानांना वीरमरण, ६ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:20 PM2020-07-30T13:20:55+5:302020-07-30T13:24:24+5:30
घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली.
इंफाळ - मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर उग्रवाद्यांनी मोठा हल्ला केला असून, या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आले आहे, तर सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली.
हल्ला झाला तो संपूर्ण भाग पर्वतमय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक उग्रवादी संघटना पिपल्स लिबरेशन आर्मीने हा हल्ला केला. दरम्यान, लष्कराने उग्रवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच भारत आणि म्यानमारच्या सीमेवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
भारत-म्यानमार सीमेवर असलेल्या उग्रवादी गटांविरोधात शोधमोहीम सुरू असताना हा हल्ला झाला. यामध्ये ४ आसाम रायफल्सच्या तीन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चंदेल जिल्ह्यातच आसाम रायफल्सच्या तळावर उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी उग्रवाद्यांनी सैनिकी तळावर बॉम्ब फेकले. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार झाला होता. मात्र त्या हल्ल्यात लष्कराची कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.