बिहारमध्ये मुसळधार; विजा पडून ७० मृत्युमुखी
By admin | Published: June 23, 2016 01:47 AM2016-06-23T01:47:48+5:302016-06-23T01:47:48+5:30
बिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून आता ७0 लोक मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी झाले आहेत.
एस.पी. सिन्हा, पाटणा
बिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून आता ७0 लोक मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपत्कालीन बैठक घेतली आणि बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
राज्यात मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने सर्वसामान्यांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी पावसाने घातलेल्या थैमानाने अनेक घरांवर दु:खाची कुऱ्हाडच कोसळली. आपत्ती व्यवस्थापनमंत्री चंद्रशेखर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आतापर्यत ५६-५७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
१५ जिल्ह्यांमध्ये कहर
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सांगण्यानुसार हे मृत्यू राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. पाटणा जिल्ह्यात सर्वाधिक सहा जण ठार झाले. तर रोहतास आणि बक्सरमध्ये प्रत्येकी पाच लोकांचा बळी गेला. याशिवाय भोजपूर, नालंदा, कैमूर, औरंगाबाद आणि पूर्णियात प्रत्येकी चार जण ठार झाले. तर सहरसा, किटहार आणि सारण जिल्ह्यात प्रत्येकी तिघांचा बळी गेला.
भागलपूर, मुंगेर आणि समस्तीपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन जण मृत्युमुखी पडले. बांका, मधेपुरा, मुजफ्फरपूर आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात एक-एक जण ठार झाला. इतर भागात आणखी तीन मृत्यू झाले. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.
सर्व जखमींवर जिल्हा प्रशासनाकडून उपचार केले जात असल्याचे विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली
दुसरीकडे नेपाळचे तराई क्षेत्र आणि उत्तर बिहारच्या जलग्रहण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांमधील पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील अनेक ठिकाणी दबाव निर्माण झाला आहे. परिस्थिती लक्षात घेता जलसंसाधन विभागाने अलर्ट जारी केला आहे.
नेपाळमध्ये कोसी नदीच्या वराह आणि वीरपूर क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोसीसोबतच नेपाळमधून उत्तर बिहारकडे वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय पश्चिमेकडील वाल्मीकीनगरमध्ये सुरूअसलेल्या पावसाने गंडक नदीही फुगत चालली आहे. सोन नदीचीही हीच स्थिती आहे.
उत्तर प्रदेशात वीज कोसळून २४ ठार
गाझीपूर : उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील जमानिया तहसिलीअंतर्गत अनेक गावांमध्ये पावसामुळे वीज कोसळून २४ जण ठार तर चार जखमी झाले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरिबल्लमपूर गावात संतोष आणि गुलाब यादव हे दोघे मंगळवारी गुरे चराईसाठी घेऊन गेले असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊन त्यांच्यावर वीज कोसळली.
दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर घटनांत मौहाली गावात वीज कोसळून बालेश्वर यादव, पियरीत कुंदन, हमीदपूरमध्ये रीना यादव आणि उनियात जुनेद खा यांचा मृत्यू झाला.
मुख्यालयात देखरेख कक्ष
या नद्यांवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यालयात देखरेख कक्ष स्थापन केला आहे. पुराच्या परिस्थितीत हा कक्ष नद्यांमधील पाण्यांच्या पातळीसोबतच किनाऱ्यावरील भागावर लक्ष ठेवेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये वीज कोसळून झालेल्या मृत्यूच्या घटनांबद्दल शोक व्यक्त केला आहे.