गलवानमध्ये ४ नव्हे, ३८ चिनी सैनिकांचा मृत्यू; भारतीय जवानांसोबतचा पंगा महागात पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 09:26 AM2022-02-03T09:26:22+5:302022-02-03T09:28:40+5:30
चीनचा खोटारडेपणा पुन्हा उघड; चीन सरकारच्या दाव्यांची पुराव्यांसहीत चिरफाड
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारत आणि चीनचे सैनिक भिडले. या रक्तरंजित संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. मात्र चीननं मृत सैनिकांचा आकडा कायम लपवला. आता या प्रकरणात ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. हिंसक झटापट सुरू असताना चीनचे ३८ सैनिक वाहून गेल्याचं वृत्त 'द क्लॅक्सन' वृत्तपत्रानं दिलं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत केवळ ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचं याआधी चीन सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र हा दावा 'द क्लॅक्सन'नं खोडून काढला आहे.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन'नं 'गलवान डिकोडेड' नावानं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांच्या टीमनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांसोबत झालेल्या झटापटीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) अनेक जवान गलवान नदीत वाहून गेले होते अशी खळबळजनक माहिती 'द क्लॅक्सन'नं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे चीनचं पितळ उघडं पडलं आहे.
गलवानमध्ये रात्रीच्या सुमारास झटापट झाली. त्यावेळी चीनचे कमीत कमी ३८ सैनिक नदीत बुडाले, असा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या हवाल्यानं करण्यात आला आहे. गलवानमधील संघर्षात केवळ ४ सैनिक मारले गेल्याचा दावा चीन सरकारनं केला होता. 'त्या रात्री नेमकं काय घडलं, कोणत्या कारणामुळे झटापट झाली, संघर्ष पेटला, याबद्दलची सगळीच माहिती चीनकडून लपवण्यात आली. चीननं जगाला धादांत खोटी माहिती दिली. चिनी अधिकाऱ्यांनी अनेक ब्लॉग्स आणि पेजेस डिलीट केले. मात्र चीनमधून मिळालेल्या डिजिटल अर्काईव्हमधून वेगळाच तपशील पुढे आला आहे', असं 'द क्लॅक्सन'नं वृत्तात म्हटलं आहे.
गलवानमध्ये जून २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. ४ दशकात पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष झाला. यामध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांचा आकडा चीननं सातत्यानं लपवला. मात्र गेल्या फेब्रुवारीत चीननं आपल्या चार सैनिकांना मरणोत्तर सन्मान दिला. गलवानमध्ये ४ सैनिक मारले गेल्याचं चीननं कबूल केल्याचं ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं म्हटलं आहे. भारतीय हद्दीत चीननं बांधकाम सुरू केल्यानं भारतीय जवानांनी गलवान नदीच्या एका किनाऱ्यावर अस्थायी पुलाची बांधणी सुरू केली. त्यावरून भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले.