फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 10:44 AM2023-07-30T10:44:12+5:302023-07-30T10:45:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कृष्णागिरी : तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन महिलांसह आठजणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
बोगनापल्ली गावातील पझायापेट्टई येथे एका खासगी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठजणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. बचावकार्यात आणखी गती वाढवण्याचे आवाहन केले आहे.
मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी तीन लाख रूपये, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आठजणांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अमित शाह हे तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.