अग्निकल्लोळ! बाईक शोरूमला भीषण आग; शेकडो वाहनं जळून खाक, लाखोंचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:13 PM2023-12-28T17:13:19+5:302023-12-28T17:14:55+5:30
आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
यूपीच्या भदोही जिल्ह्यात एका बाईक शोरूमला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे लोळ पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत शोरूममध्ये उभ्या असलेल्या शेकडो नवीन बाईक जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ही घटना शहरातील कोतवाली भागातील हरियांवमध्ये घडली आहे, जिथे टीव्हीएस बाईकचा एक मोठं शोरूम आहे. या शोरूममध्ये शेकडो बाइक्स होत्या. आज (28 डिसेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या शोरूमला भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांची मदत घ्यावी लागली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झालं आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात नवीन बाईक जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शोरूम ऑपरेटरचा दावा आहे की 300 हून अधिक बाईक आणि लाखोंचे पार्ट्स जळून खाक झाले आहेत.
या प्रकरणी एसडीएम शिव प्रकाश यादव यांनी सांगितले की, सकाळी 8 वाजता हरियाणा रोडवर असलेल्या बाईक शोरूमला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यावर सीओ तात्काळ पोलीस स्टेशन फोर्स आणि चौकी फोर्ससह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पाच गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.